भुसावळ वरुण हॉटेल हल्ला प्रकरण : निषेधार्थ जिल्ह्यातील दारू दुकाने दुपारी १ वाजेपर्यंत बंद;

भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ तालुक्यातील साकेगावजवळील वरुण हॉटेलमध्ये २३ जून रोजी रात्री झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या घटनेनंतर मद्यविक्री व्यवसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या घटनेचा तीव्र निषेध म्हणून आज २५ जून रोजी बुधवारी दुपारी १ वाजेपर्यंत संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील मद्यविक्री आस्थापना बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा मद्य विक्रेता असोसिएशनने घेतला .

२३ जूनच्या रात्री सुमारे ८.३० वाजता साकेगावजवळील वरुण हॉटेलमध्ये बिलाच्या वादातून सुमारे १५ ते २० अज्ञात हल्लेखोरांनी प्रवेश करून हॉटेलमध्ये जबर तोडफोड केली. या दरम्यान कर्मचाऱ्यांवर चाकू, बाटल्या व काचेच्या वस्तूंनी हल्ला करण्यात आला. हॉटेल मॅनेजर सुमित सुभाष इंगले (वय ३३, रा. भुसावळ) यांच्या डोक्यावर काचेच्या बाटलीने वार करून त्यांना गंभीर जखमी करण्यात आले. तसेच हल्लेखोरांनी हॉटेलच्या गल्ल्यातून सुमारे २० ते २५ हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली, तसेच हॉटेलमधील CCTV DVR मशीन घेऊन पळ काढला, या घटनेत अन्य कर्मचाऱ्यांनाही मारहाण झाली असून, सर्वांवर उपचार सुरु आहेत. या प्रकरणी फिर्यादी सुमित इंगले यांच्या तक्रारीनुसार, कुणाल आहिरे (पूर्ण नाव अज्ञात), सोनू मस्के, नवीन लोखंडे, अमोल भुसारी (सर्व रा. भुसावळ) आणि ८-१० अज्ञात विरुद्ध . तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान घडल्या प्रकारामुळे संपूर्ण मद्यविक्री व्यावसायिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाली असून जिल्ह्यात वारंवार गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टोळ्यांकडून त्रास होत असून, पोलीस व प्रशासन यांच्याकडून ठोस पावले उचलली जात नसल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे. घटनेच्या पार्श्वभूमीवर २५ जून रोजी सकाळी १० वाजता हॉटेल सिल्वर पॅलेस, जळगाव येथे जिल्हा मद्य विक्रेता असोसिएशनची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीनंतर जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना निवेदन सादर करण्यात आले व घटनेतील दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

, जिल्ह्यातील सर्व दारू दुकाने व मद्यविक्री केंद्रे दुपारी १ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आले असल्याचे असोसिएशनने स्पष्ट केले आहे.