शिर्डीत पार्टीसाठी अल्पवयीनांनी केली ४२ वर्षीय प्रौढाची हत्या

शिर्डी – पार्टी करण्यासाठी पैसे नसल्याने सात अल्पवयीनांनी 42 वर्षीय प्रौढाची निर्घृण हत्या केली. ही धक्कादायक घटना शिर्डीत घडल्यानंतर भाविकांमध्ये खळबळ उडाली.
कोपरगाव तालुक्यातील हांडेवाडी येथील गणेश सखाहरी चत्तर हे 8 जूनपासून बेपत्ता होते. त्यानंतर नांदुर्खी बुद्रुक येथील एका उसाच्या शेतात त्यांचा मृतदेह आढळून आला होता. त्यांच्या पाठीवर धारदार शस्त्राने वार केल्याचे स्पष्ट झाले होते. पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे मृत व्यक्तीचा मोबाईल क्रमांक शोधून काढला. चौकशीत समोर आले की, मृताचा मोबाईल एका अल्पवयीन मुलाने साडेचार हजार रुपयांना विकला होता आणि त्याच पैशातून आरोपींनी वाढदिवसाची पार्टी केली होती.
वाढदिवसाच्या पार्टीसाठी गणेश चत्तर पायी जात असताना अपहरण करण्यात आले. नशेच्या अवस्थेत असलेल्या मुलांनी आधी त्यांना काठी व हातांनी मारहाण केली, नंतर गळा दाबून आणि धारदार चाकूने हल्ला करून हत्या केली. त्यांचा मृतदेह उसाच्या शेतात फेकून दिला आणि मोबाईल घेऊन आरोपी पसार झाले. याच मोबाईलच्या ट्रॅकिंगमुळे पोलिसांनी सातही अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. शिर्डी पोलीस ठाण्यात या प्रकरणी अपहरण व खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.