केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळून 7 जणांचा मृत्यू ; खराब हवामानामुळे अपघात झाल्याचा अंदाज

अहमदाबादहून लंडनसाठी निघालेले एअर इंडियाचे विमान कोसळल्याची घटना अजून धगधगत असताना आता केदारनाथमध्ये एक मोठा हेलिकॉप्टर अपघात झाला आहे. यात ७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तराखंडमधील केदारनाथजवळ आर्यन एव्हिएशन कंपनीचं एक हेलिकॉप्टर कोसळलं. केदारनाथमधील गरुडचट्टीजवळ हा मोठा अपघात झाला. या हेलिकॉप्टर अपघातात पायलटसह सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सकाळी साधारण 5.30 च्या सुमारास ही घटना घडली. खराब हवामानामुळे हा अपघात झाला असावा, अशी माहिती समोर येत आहे.

केदारनाथमधील गौरीकुंड परिसरात हे हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर मोठ्या प्रमाणात धूर येण्यास सुरुवात झाली. यानंतर त्या ठिकाणी गवत कापणाऱ्या महिलांनी तात्काळ प्रशासनाला याबद्दलची माहिती दिली. हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती मिळताच एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या टीम्स लगेच घटनास्थळी पोहोचल्या. मात्र खराब हवामानामुळे बचावकार्यात अडथळे आले. या हेलिकॉप्टरमध्ये पायलटसोबत 5 प्रौढ आणि दोन लहान मुलं प्रवास करत होते. त्यांचा जागीच मृत्यू झाला.

सध्या घटनास्थळी हेलिकॉप्टरचे अनेक अवशेष विखुरलेले पडले आहेत. या घटनेवर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी ट्वीटरवर पोस्ट केली आहे. “जनपद रुद्रप्रयागमध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्याची अत्यंत दुःखद बातमी मिळाली आहे. एसडीआरएफ, स्थानिक प्रशासन आणि इतर बचाव पथके मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत. यासाठी केदारनाथांकडे मी सर्व प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करतो.” असे पुष्कर सिंह म्हणाले.

दरम्यान चारधाम यात्रेदरम्यान भाविक त्रास टाळण्यासाठी आणि चढाई न करता हेलिकॉप्टरचा वापर करतात. मात्र, अलीकडच्या काळात केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वीच एका हेलिकॉप्टरला रस्त्यावर इमर्जन्सी लँडिंग करावी लागली होती. त्याशिवाय, काही दिवसांपूर्वी उड्डाण करण्यापूर्वीच आणखी एका हेलिकॉप्टरचा अपघात झाला होता.१७ मे रोजी केदारनाथमध्ये एक एअर एम्ब्युलन्स हेलिकॉप्टर क्रॅश झाले होते. त्यावेळी हेलिकॉप्टरमध्ये पायलट, डॉक्टर आणि नर्स असे तीन जण होते. सुदैवाने ते तिघेही सुरक्षित बचावले होते. हे हेलिकॉप्टर ऋषिकेश एम्समधून रुग्णाला आणण्यासाठी केदारनाथला जात होते. त्यावेळी लँडिंग करताना हा अपघात झाला होता आणि ते जमिनीवर कोसळले होते.