भुसावळ (प्रतिनिधी ) - जागतिक स्तरावर सर्वात आव्हानात्मक व सर्वात जूनी मॅरेथॉन अशी ओळख असलेल्या कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनचे धावपटू व प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ तुषार पाटील यांनी यशस्वी सहभाग नोंदविला. त्यांनी ९० किमीचे अंतर ११ तास ४८ मिनिटात धावून पूर्ण केले व शहराचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर नोंदविले.
प्रथम महायुद्धात शहीद झालेल्या दक्षिण आफ्रिकेतील सैनिकांच्या स्मुती व त्यांच्याप्रति आदरांजली या हेतुने या मॅरेथॉनचे १९२१ पासुन आयोजन करण्यात येते. यावर्षी ९८ वी कॉम्रेड मॅरॉथॉन द कॉम्रेड मॅरेथॉन असोसिएशन बोर्ड या संस्थेद्वारे पिटरमटिर्झबर्ग येथे आयोजीत करण्यात आली होती. जगभरातील १२१ देशांतील २४००० स्पर्धकांना प्रवेश देण्यात आला होता. दक्षिण आफ्रीकेतील स्थानिक वेळेनुसार पहाटे ५.४५ व ६.०० वाजता अशा दोन टप्प्यात (भारतीय वेळेनुसार सकाळी ९.१५ व ९.३० वाजता ) कॉम्रेड मॅरॉथॉन सिटी हॅाल पीटर्सनारीबर्ग येथून सुरु झाली व डर्बनला सायंकाळी ५.४५ व ६.०० वाजता समाप्त झाली. भारतातील ४०३ धावकांनी कॉम्रेड स्पर्धेत सहभाग घेतला होता. यात ४२ महिला व ३६१ पुरुष होते.

कॉम्रेड मॅरॉथॉन गन टाईम नुसार सुरु होते व बरोबर १२ तासानंतर संपते. त्या वेळेनंतर कुणीही फिनिश लाईन क्रॉस करु शकत नाही. पाईनटाऊन, विनस्टन पार्क, ड्रयुमॉन्ड, कॉटो रिज, अलमास रोड, मॅकोनडेनी असे ६ टप्पे विहित वेळेच्या आत पुर्ण करणारा स्पर्धकच या फिनीश लाईन पर्यन्त पोहचू शकतो. मॅरेथॉन सुरू झाली तेव्हा ५°c तापमान होते तर सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत २३°c चटके लागतील एवढे तापमान होते.
या मॅरेथॉनदरम्यान ४३ ठिकाणी पाणी, एनर्जेल, संत्री, केळी, बटाटे, कोक आदी पदार्थांची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच रस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी आफ्रिकन नागरिक धावकांचा उत्साह वाढविण्यासाठी आपल्या मुलाबाळांसकट हजर होती. वेळोवेळी धावपटूंचा विशेषत: भारतीय धावपटूंचा त्यांच्या नावानिशी उल्लेख करून उत्साह वाढवत होती. जयहिंद, झिंदाबाद, कमाँन इंडिया, चक दे इंडिया, नमस्ते इंडिया असा उल्लेख करून भारतीय धावपटूंचा आनंद द्विगुणित करत होती. हे सर्व नागरिक मॅरेथॉन संपेपर्यंत रस्त्याच्या कडेला सज्ज होती. प्रत्येकाला पाणी, केळी, संत्री, चॉकलेट्स, बटाटे, ब्रेड बटर पुरवत होती. प्रत्येक ठिकाणी वैद्यकीय सेवा देखील पुरविण्यात आली होती. पायाला मसाज करून देणे, बर्फाने शेकून देणे, स्प्रे मारणे इत्यादी बाबी अगदी आनंदाने आणि तत्परतेने करत होती. मॅरेथॉनच्या मार्गावरील रस्ते फक्त धावपटूंसाठी आरक्षित ठेवण्यात आले होते. पूर्ण मार्गामध्ये पोलीस व्हॅन, मेडिकल व्हॅन व्यतिरिक्त एकही वाहन सोडण्यात आले नाही. खुप उत्साहपूर्ण वातावरणात ही स्पर्धा पार पडली असे प्रतिपादन डॉ तुषार पाटील यांनी केले.
कॉम्रेड्स स्पर्धा काय असते : कॉम्रेड्स मॅरेथॉन ही अंदाजे ९० किलोमीटरची अल्ट्रामॅरेथॉन आहे, जी दक्षिण आफ्रिकेतील क्वाझुलु-नताल प्रांतात दर वर्षी डर्बन आणि पीटरमारिट्झबर्ग शहरांदरम्यान आयोजित केली जाते. ही जगातील सर्वात मोठी आणि सर्वात जुनी अल्ट्रामॅरेथॉन शर्यत आहे. कॉम्रेड्स मॅरेथॉन शर्यतीची दिशा दर वर्षी डर्बन पासून सुरू होऊन पीटरमारिट्झबर्गला संपणारी “अप” रन (८७ किमी) आणि पीटरमेरिट्झबर्गपासून सुरू होऊन डर्बनला संपणारी “डाउन” रन (९०.१८४ किमी) अशी असते.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ४२.२ किमीची पूर्ण मॅरेथॉन ४ तास ५०मिनिटाच्या आत पूर्ण केलेली असणे आवश्यक असते. तसेच कॉम्रेड्स मॅरेथॉन यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी तुमची शारीरिक क्षमता तर असावीच लागते पण त्याच बरोबर तुमची मानसिक शक्ती, इच्छाशक्ती सुद्धा प्रबळ असावी लागते.
डॉ तुषार पाटील यांच्या या कामगिरीबद्दल त्यांचे परिवारातील सदस्य, मित्रमंडळी, शहरातील सर्व धावपटू, खेळाडू व असंख्य नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.



