चोरवडचा तरुण बनला पहिलाच अग्निवीर; ग्रामस्थांनी काढली भव्य मिरवणूक –

। भूसावळ प्रतिनिधी

प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत भुसावळ तालुक्यातील चोरवड गावातील तरुणाची सैन्य दलात अग्निवीर म्हणून निवड झाली. प्रशिक्षण पूर्ण करून हा तरुण गावी परतताच चोरवडकरांनी एकत्र येत गावाच्या इतिहासात प्रथमच अग्निवीर झालेल्या तरुणाचा सहृदय सत्कार करीत त्याची भव्य मिरवणूक काढून स्वागत केले आहे.
सौरव संदीप दुबोले असे या अग्निवीराचे नाव असून त्याची आता अरुणाचल प्रदेशात नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत तरुणाची निवड

चोरवड गावातील रहिवासी असलेले संदीप देविदास दुबोले हे व्यवसायाने रिक्षा चालक आहे तर आई शेती काम करून घर संसाराला हातभार लावते. दुबोले दाम्पत्याचा मुलगा सौरव याने प्रतिकुल परिस्थितीतही हार न मानता सराव केला व त्याची सैन्य दलात अग्निवीर म्हणून निवड झाली. मराठा इन्फ्रट्री बेळगाव येथे प्रशिक्षण त्याने नुकतेच पूर्ण केले असून त्याची पोस्टिंग अरुणाचल प्रदेशात करण्यात आली.

प्रशिक्षण पूर्ण करून हा तरुण गावी येताच चोरवडकरांनी गावातून प्रथमच झालेल्या सैनिकाची भव्य अशी मिरवणूक काढून त्याचे स्वागत केले. सौरव चा स्वागत समारंभ गावातील मित्रपरिवार, नातेवाईक व सगेसोयरे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी गावात पोस्टर लावण्यात आले तसेच दारासमोर रांगोळ्या काढण्यात आली तसेच घरोघरी दिवे लावून तसेच फटाके वाजवून स्वागत केले आहे .