मुंबई,

राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. येत्या चार दिवसात पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, मराठवाड्यासह विदर्भात पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात शनिवारी वीजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय.
मुंबईसह पुण्यात अनेक भागात सकाळपासून पावसाने हजेरी लावलीय. पुणे शहरात काही भागात जोरदार पाऊस झाला. येत्या २४ तासात मुंबई, ठाण्यासह उपनगराग हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडा विदर्भातही ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या.
यंदा मान्सून लवकर आला असला तरी आठवड्याभराने त्याचा वेग मंदावला. आता उत्तरेकडे मान्सूनचा प्रवास सुरू आहे. उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. कोकण, मुंबई तसंच मध्य महाराष्ट्रात शुक्रवारी काही भागात मुसळधार पाऊस झाला.
या भागांना येलो अलर्ट
राज्यात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, नाशिक, जळगाव, बुलढाणा, अमरावती, वाशिम, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, बीड, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, अहमदनगर, धुळे, जालना या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलाय. तर १३ ते १८ जून या कालावधीत राज्यातील बहुतांश भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.


