उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वैमानिकाचा खो ! मंत्र्यांच्या मनधरणीनंतर विमानाचे टेक-ऑफ –

: जळगावः राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शुक्रवार ६ जून रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. जिल्ह्यातील विविध कार्यक्रम आटोपून उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे हे मुंबईला परतण्यासाठी विमानतळावर पोहचले असता त्यांना वैमानिकाचा हेकडपणा चांगलाच भोवला. यावेळी वैमानिकाने उड्डाण करण्यास नकार दिल्याचा प्रकार घडला. उपमुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या या प्रकाराची चांगलीच चर्चा आहे.

राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शुक्रवार ६ जून रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर होते. ते अचानक जिल्हा दौऱ्यावर येत त्यांनी मुक्ताईनगरातील संत मुक्ताई पालखी सोहळ्यास भेट दिली. यावेळी त्यांच्या सोबत ना. गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, आ. चंद्रकांत पाटील, प्रा. चंद्रकांत सोनवणे, अॅड. रवींद्र सोनवणे, अॅड. संदीप पाटील यांच्यासह वारकरी उपस्थित होते.

मुक्ताईनगर येथील कार्यक्रमानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यातील विविध कार्यक्रम आटोपून ते मुंबईला प्रस्तान करण्यासाठी जळगाव विमान तळ गाठलं. मात्र, एकनाथ शिंदे या ठिकाणी पोहचले असता चक्क एका वैमानिकाकडून त्यांना खो मिळाल्याचा प्रकार समोर आला आहे. शिंदे हे जळगावहून मुंबई परतण्यासाठी जळगाव विमानतळावर आले असता विमानाच्या पायलटने उड्डाण घेण्यास नकार दिल्याची चर्चा होती. उपमुख्यमंत्र्यांवर अशी वेळ ओढावण्याची कदाचीत ही पहिलीच वेळ असावी. दरम्यान, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता ना. गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ. माहेश्वर रेड्डी यांनी विमान अधिकारी यांच्याशी चर्चा करत वैमानिकाची मनधरणी केल्यानंतर काही वेळाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विमान मुंबईच्या दिशेने टेक-ऑफ झाले. उपमुख्यमंत्र्यांसोबत हा प्रकार घटल्याने याबाबत चांगलीच चर्चा रंगली. मात्र, ना. गिरीश महाजन यांनी, वैमानिकाचा तांत्रिक विषय होता, त्यामुळे उड्डाणास उशीर झाल्याची सावरासावर केली. असे असले तरी एका वैमानिकाने उपमुख्यमंत्र्याला खो दिल्याची जोरदार चर्चा जिल्ह्यात रंगली होती.