“ग्लोबल रनिंगदिनी डॉ तुषार पाटलांसोबत पाच किमी धावून कॉम्रेड मॅरेथॉनसाठी दिल्या शुभेच्छा: भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनचा उपक्रम”

भुसावळ ( प्रतिनिधी ) –
जून महिन्याचा प्रथम बुधवार संपूर्ण जगात रनिंग दिवस म्हणून साजरा केला जातो. अधिकाधिक नागरिकांनी दैनंदिन जीवनात धावण्याचा सराव करावा व आपले आरोग्य निरोगी करावे हा मुख्य हेतू या दिवसाचा आहे. भुसावळ शहरात डिसेंबर २०१७ पासून भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनच्या माध्यमातून खूप साऱ्या नागरिकांनी धावण्याचा सराव करून देशभरातील विविध मॅरेथॉनमध्ये यशस्वी सहभाग नोंदविला आहे. यात महिलांची संख्या लक्षणीय आहे. त्याचबरोबर ८ जून रोजी दक्षिण आफ्रिका येथे आयोजित जगप्रसिद्ध ९० किमी कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये भुसावळ शहरातील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ व असोसिएशनचे लाडके धावपटू डॉ तुषार पाटील हे सलग चौथ्यांदा सहभागी होणार आहेत. त्यांना सदिच्छा देण्यासाठी सर्व महिला व पुरुष धावपटू त्यांच्यासोबत पाच किमी धावले.

याप्रसंगी धावपटू बंधू व भगिनींमुळे इतके मोठे अंतर धावण्याची ऊर्जा मिळते अशी कृतार्थ भावना डॉ तुषार पाटील यांनी व्यक्त केली.
पहाटे ठीक ५.४५ वाजता कृष्णचंद्र सभागृहाशेजारील मैदानावर असोसिएशनचे प्रमुख प्रविण फालक यांच्या मार्गदर्शनात सर्व धावपटांनी वार्म अप व्यायाम केला. त्यानंतर प्रत्यक्ष धावायला सुरुवात झाली. यावेळी डॉ तुषार पाटील अग्रस्थानी व त्यांच्यासोबत इतर सर्व धावपटू रेल्वे स्टेशन – डीआरएम कार्यालय – लाल चर्च – लोको शेड व तेथून मैदानावर परत अशाप्रकारे मार्गस्थ होऊन सर्वांनी आनंदात हळूहळू पाच किमी अंतर पूर्ण केले. धावताना भारत माता की जय, वंदे मातरम आदी देशभक्तीपर घोषणांसोबतच तुषार दादांना शुभेच्छा देणाऱ्या घोषणा धावपटू देत होते. त्यामुळे पहाटे कामानिमित्त व फिरायला निघालेले नागरिक या उत्साहपूर्ण वातावरणात सर्व धावपटूंचे कौतुक करीत होते.
मैदानावर परतल्यावर स्ट्रेचिंग व्यायाम प्रकार घेण्यात आला. त्यानंतर ग्लोबल रनिंग दिनानिमित्त प्रातिनिधिक स्वरूपात सायली बेंडाळे या महिला धावपटूचा सत्कार डॉ नीलिमा नेहेते व डॉ चारुलता पाटील यांनी केला. यावेळी मंगला पाटील, संगीता चौधरी, सरला पाटील, स्वाती भोळे, स्वाती फालक या त्यांच्या मैत्रिणीसोबतच सर्व महिला धावपटूंनी त्यांचे विशेष कौतुक केले व नव्याने दाखल होऊन देखील आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे सर्वांना प्रभावित केल्याचे सांगितले. त्यानंतर असोसिएशनतर्फे प्रा प्रविण फालक व विजय फिरके यांनी डॉ तुषार पाटील यांचा विशेष सत्कार केला.

यावेळी महेंद्र पाटील, विलास पाटील, मंगेश चंदन, प्रविण वारके, गणसिंग पाटील, मुकेश चौधरी, संजय भदाणे, तरुण बीरिया, अजय आंबेकर, संतोष घाडगे, राजेंद्र ठाकूर जितेंद्र चौधरी आदी धावपटूनसोबतच सर्वांनी मोठा जल्लोष केला. यावेळी डॉ तुषार पाटील यांनी आपल्या मनोगतात सर्वांचे आभार मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविण पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निलांबरी शिंदे, पारुल वर्मा, किर्ती मोटळकर, छोटू गवळी, राजेंद्र घाटे, प्रशांत वंजारी यांचे सहकार्य लाभले.