धुळे तालुक्यात दीड वर्षीय बालकाचा खून : विवाहित प्रेयसीसह प्रियकराला बेड्या –

धुळे – धुळे तालुक्यात दीड वर्षीय बालकाचा आपटून खून करीत मृतदेह पुरण्यात आल्याची धक्कादायक घटना रामी शिवारात घडली होती. पोलिसांनी गुन्ह्याची उकल करीत या प्रकरणी प्रियकरासह त्याच्या विवाहित प्रेयसीला अटक केली होती. पंकज बागुल व सुरेखा सोनवणे अशी आरोपींची नावे आहेत.
रामी येथील सागर गिरासे यांच्या शेतात पंकज बागुल हा शेतमजुरी करत होता व त्याच्यासोबत सुरेखा सोनवणेदेखील वास्तव्यास होती. सुरेखाला पहिल्या पतीपासून दीड वर्षांचा मुलगा कार्तिक होता. शुक्रवार, 16 मे रोजी सुरेखा व पंकजमध्ये भांडण झाल्यानंतर पंकजने कार्तिकला आपटून मारले. त्यानंतर दोघांनी शेतात कार्तिकचा मृतदेह पुरला. या विषयीची माहिती पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी मृतदेह बाहेर काढल्यानंतर जागीच मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.

या प्रकरणी शेतमालक सागर गिरासे यांनी तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल झाला. खून प्रकरणी पंकज बागुल व सुरेखा सोनवणे यांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयाने 4 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. तपास पोलिस अधिकारी सचिन कापडणीस करीत आहेत.