व्हिजिलन्सची धाडीनंतर अधिकार्‍याने खिडकीबाहेर फेकली नोटांची बंडले : दोन कोटींची माया जप्त –

भुवनेश्वर : भ्रष्टाचार विरोधी पथकाने मोठी कारवाई करत ग्रामीण विकास विभागातील मुख्य अभियंते बैकुंठनाथ सारंगी यांच्या घरावर धाड टाकत 2.1 कोटी रुपयांची रोकड जप्त केली. उत्पन्नाहून अधिक संपत्ती जमा केल्याच्या तक्रारीवरून सारंगी यांच्यावर कारवाई करण्यात आली. ज्यात भुवनेश्वर, अंगुल आणि पुरी जिल्ह्यातील मालमत्तेवर ओडिशाच्या भुवनेश्वरमध्ये एकाचवेळी छापेमारी करण्यात आली.

तपास पथकांनी जेव्हा भुवनेश्वर येथील पीडिएन एग्जोटिका इथल्या बैकुंठनाथ सारंगी यांच्यावर फ्लॅटवर धाड टाकली. त्यावेळी सारंगी यांनी 500 च्या नोटांचे बंडल खिडकी बाहेर फेकले. त्यानंतर तातडीने तिथे असलेल्या पथकांनी त्यांना पकडले आणि फेकलेल्या नोटाही जप्त करण्यात आल्या. भुवनेश्वर इथल्या फ्लॅटमध्ये 1 कोटींची रोकड पकडण्यात आली. अंगुल जिल्ह्यातील करदागाडिया येथील दुमजली निवासस्थानातून 1.1 कोटी रुपये रोकड सापडली. त्

याशिवाय पुरी जिल्ह्यातील विविध ठिकाणांवरही छापेमारी करण्यात आली. एकूण 8 ठिकाणी टाकलेल्या धाडीत 8 डिप्टी एसपी, 12 निरीक्षक, 6 एएसआय आणि अन्य अधिकार्‍यांचा समावेश होता. सारंगी यांच्या कार्यालयाचीही झडती घेण्यात आली. अद्यापही छापेमारी सुरू असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. राज्य सरकारी कार्यालयाच्या मुख्य अभियंत्याच्या घरासह 8 ठिकाणांवर केलेल्या कारवाईमुळे खळबळ माजली. या कारवाईत 2 कोटींहून अधिकची रोकड जप्त करण्यात आली.