भुसावळ (प्रतिनिधी ) : सोशल मिडीयावर कमी कमी किेंमतीत इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विक्रीच्या आमिषाने फरिदाबादच्या तक्रारदाराला तब्बल 17 लाख 10 हजार 180 रुपयांचा गंडा घालण्यात आला होता. सायबर पोलिसात तक्रार नोंदवल्यांनतर संशयीत भुसावळातील असल्याचे निष्पन्न होताच स्थानिक पोलिसांची मदत घेत भुसावळ येथील सिंधी कॉलनीतील रहिवासी निखील सुनीलकुमार मनवानी याला गुरुवारी अटक करण्यात आली.

काय आहे नेमके प्रकरण
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2024 रोजी सायबर फसवणुकीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला. फरिदाबाद येथील डॉ. श्रीमंत गुईन यांची ऑनलाइन इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याच्या बहाण्याने 17 लाख 10 हजार 180 रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी फरिदाबाद सायबर क्राईम सेंट्रल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. झारखंड, छत्तीसगड, उत्तर प्रदेश या राज्यामध्ये इन्स्टाग्रामवरून अल्प दरात इलेक्ट्रीक वस्तू विक्रीची जाहिरात केल्यानंतर या आमिषाने अनेक बळी पडले.
डॉक्टरांना घातला 17 लाखांचा गंडा
डॉ. श्रीमंत गुईन यांनी 6 सप्टेंबर 2024 रोजी इन्स्टाग्रामवर एक खाते पाहिले. या खात्याच्या बायोमध्ये दिलेल्या व्हॉट्सअॅप बिझनेस पेजशी त्यांनी संपर्क साधला. त्यानंतर मनीष शर्मा नावाच्या व्यक्तीने त्यांना व्हॉट्सअॅप क्रमांक 6232202835 वरून संपर्क साधला. डॉ. गुईन यांना काही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करायच्या असल्याचे त्यांनी संशयीत मनीष शर्माला सांगितले. यावेळी डॉ. श्रीमंत गुईन यांना विविध बँक खात्यात पैसे टाकण्या सांगण्यात आले. विविध खात्यांमध्ये 17 लाखांची रक्कम जमा झाली मात्र वस्तू येत नसल्याने संशय वाढला व त्यांनी सायबर पोलिसात तक्रार दिली.
अशी स्वीकारली रक्कम
आरोपीने श्रीनिवास राव (आयडीबीआय बँक) 10 लाख 95 हजार 180, तपश घोष (इंडसलँड बँक) 2,68,000, दीपक (क्सिस बँक) 2,91,000, दशरथ (युपीआय) 56 हजार रुपये ऑनलाईन स्वीकारले.
डॉ.श्रीमंत गुईन यांनी तत्काळ फरिदाबाद सायबर क्राईम सेंट्रल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करताच तांत्रिक विश्लेषणानंतर आरोपी निष्पन्न करण्यात आला. सहाय्यक उपनिरीक्षक उधम सिंग यांच्याकडै या प्रकरणाचा तपास आहे.
स्थानिक पथकाच्या मदतीने आरोपीला बेड्या
शहरातील सिंधी कॉलनीतील रहिवासी निखील मनवाणी हा या प्रकरणातील मुख्य संशयीत असल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आल्यावर फरीदाबाद येथील क्राईम ब्रँचच्या पथकाने भुसावळात येत बाजारपेठ पोलिस ठाण्यात निरीक्षक राहुल वाघ यांची भेट घेतली. बाजारपेठ पोलिसांच्या डीबी पथकातील पोलिसांच्या सहकार्याने मनवाणी याला अटक करण्यात आली व पथक संशयीताला फरीदाबादला सोबत घेऊन गेल्याचे सूत्रांनी सांगितले.


