भारत-पाकिस्तान यांच्यात 18 मे पर्यंत शस्त्रसंधी’ पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांचं मोठं वक्तव्य !

नवी दिल्ली,

भारत आणि पाकिस्तानमधील शस्त्रसंधी केवळ 18 मे पर्यंतच आहे, असं धक्कादायक वक्तव्य पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी केलं आहे. एएफपी या वृत्तसंस्थेनं याबाबतचं वृत्त दिलंय. त्यानंतर भारत-पाकिस्तान संघर्षाबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

भारत आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा लष्करी संघर्ष सुरू होणार आहे का? 18 मे नंतर पाकिस्तानकडून पुन्हा ड्रोन आणि क्षेपणास्त्रांद्वारे हल्ले होतील का? भारत त्याला प्रत्युत्तर देईल का? असे प्रश्न विचारले जात आहेत. कारण पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्र्यांनी स्वतःच शस्त्रसंधीची अंतिम मुदत सांगितली आहे.

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी गुरुवारी शस्त्रसंधीबाबत हे वक्तव्य केले. एएफपीने ते प्रसिद्ध केलंय. भारतावर राजकीय दबाव टाकण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. इशाक डार यांनी पाकिस्तानच्या नॅशनल अ‍ॅसेंब्लीमध्ये जाणीवपूर्वक हे वक्तव्य केलंय.

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री काय म्हणाले ?

इशाक डार यांनी सांगितलं की, “10 मे रोजी दोन्ही देशांच्या डीजीएमओ स्तरावरील चर्चेत 12 मे पर्यंत शस्त्रसंधीवर सहमती झाली. 12 मे रोजी झालेल्या चर्चेत 14 मे पर्यंत शस्त्रसंधीवर सहमती झाली. 14 मे रोजी झालेल्या चर्चेत 18 मे पर्यंत शस्त्रसंधीवर सहमती झाली.’ लष्करी स्तरावरील सहमतीनंतर राजकीय स्तरावर दोन्ही देशांमध्ये चर्चा होईल तेव्हाच ही पूर्ण सहमती बनेल, असं त्यांनी स्पष्ट केलं.