उज्जैन दर्शनाला निघालेल्या कोल्हापूरच्या भाविकांच्या वाहनाला अपघात : तीन जण जागीच ठार –

।लोणंद : ट्रक व ट्रॅव्हल्समध्ये अपघात घडल्यानंतर तीन जण ठार झाले. हा अपघात रविवारी पहाटे अडीचच्या दरम्यान फलटण तालुक्यातील सालपे येथील बिरोबा मंदिरासमोर झाला. भाविक उज्जैन दर्शनासाठी निघाल्यानंतर त्यांच्यावर संकट कोसळले.

सलमान इम्तियाज सय्यद (24, रा.मालबाग पाटील गल्ली, शिरढोण ता. शिरोळ जि. कोल्हापूर), रजनी संजय दुर्गुळे (48, रा.पेठ वडगाव ता. हातकणगले जि. कोल्हापूर) अशी मृतांची नावे आहेत.

या अपघातात ट्रॅव्हल्स चालक आणि एक महिला जागीच ठार झाले तर अन्य एक महिला गंभीर जखमी झाली तिचा सातारा सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.

इचलकरंजी येथील खासगी प्रवासी बस (एम.एच.04 सी.पी.2452) ही भाविक महिलांना घेऊन उज्जैन येथे देवदर्शनास निघाली होती. ही बस वाठार स्टेशन मार्गे सालपे घाट उतरून लोणंद दिशेकडे शनिवारी मध्यरात्री जात होती. ती बिरोबा मंदिराजवळ आली असता लोणंद बाजूकडून सातार्‍याकडे जाणारा ट्रक (एमएच 42 बीएफ 7784) आला असता दोन्ही वाहनांचा भीषण अपघात झाला.

या घटनेनंतर सालपे ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन भाविकांना मदत करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान लोणंद पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. जखमींना लोणंदच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.