आधार कार्ड रजिस्ट्रेशन न झाल्यास विविध योजनांचा लाभ थांबणार ; आधार रजिस्ट्रेशन साठी मंडळ स्तरावर सुविधा उपलब्ध

यावल – रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांच्या सुचनेनुसार तसेच प्रांताधिकारी बबनराव काकडे आणि तहसीलदार मोहनमाला नाझरकर यांच्या आदेशान्वये यावल तालुक्यात मंडळस्तरावर आधार कार्ड रजिस्ट्रेशन साठी सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे तरी लाभार्थ्यांनी तात्काळ आपले आधार रजिस्ट्रेशन करून घ्यावे अन्यथा योजनांच्या लाभांपासून वंचित राहू शकता अशी माहिती यावल तहसीलदार सौ मोहनमाला नाझीरकर यांनी दिली.
शासकीय योजनांच्या लाभासाठी आधार नोंदणी करण्यासाठी गावपातळीवर,मंडळ स्तरावर शिबिरे आयोजित करण्यात आली आहे,यावल आणि रावेर तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रातील नागरीकांना विविध दाखल्यांसाठी वारंवार यावल तहसीलच्या फेऱ्या माराव्या लागतात यातुन नागरीकांची मोठी गैरसोय आणी त्रास सोसावे लागतात या दृष्टीकोणातुन आमदार अमोलदादा जावळे यांनी नागरीकांना गावपातळीवर दाखले उपल्बध करावे अशा सुचना महसूल प्रशासनास दिल्याने प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन तहसीलच्या वतीने यावल तालुक्यात दि.७ ते २६ मे २०२५ चे दरम्यान ९ ठिकाणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले असुन, या शिबीराच्या माध्यमातुन संजय गांधी योजना,श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी,राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना,इंदिरा गांधी राष्ट्रीय योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग योजना आणि अन्य सामाजिक लाभाच्या योजनां अंतर्गत लाभार्थ्यांचे डिजीटल पोर्टलवर आधार रजिस्ट्रेशन व व्हेरिफिकेशन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.ही मोहिम तालुका व मंडळ स्तरावर प्रभावीपणे राबवण्यात येत असून,संबंधित लाभार्थ्यांना आधार पडताळणीसाठी यावल तहसील कार्यालय आणि विविध मंडळ कार्यालयांत शिबिरांमध्ये उपस्थित राहावे.
यावल महसुल प्रशासनाच्या आयोजीत करण्यात येणारी शिबीर ही पुढील प्रमाणे राहणार आहेत
१) सावखेडासीम दि. ७ बुधवार, २) भालोद दि. ८ गुरुवार , ३) साकळी दि. १३ मंगळवार, ४) किनगाव दि. १५ गुरुवार
५) बामणोद दि १९ सोमवार , ६) अंजाळे दि. २१ बुधवार ७) फैजपुर दि. २२ गुरुवार ८) न्हावी प्र यावल दि. २३ शुक्रवार
९) यावल दि. २६ सोमवारअशा प्रकारे यावल तालुक्यात शिबिर आयोजीत करण्यात आली आहे.

लाभार्थ्यांना आधार रजिस्ट्रेशन पूर्ण करण्यासाठी आधारकार्ड,दोन छायाचित्रे, मोबाईल क्र. व इतर आवश्यक कागदपत्रे घेऊन उपस्थित राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. लाभार्थ्यांना आपल्या गावा जवळील ठिकाणी उपस्थित राहता यावे,यासाठी ९ ठिकाणी ७ मे २०२५ ते २६ मे २०२५ दरम्यान शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. तरी गरजु नागरीकांनी या गाव पातळीवरील शिबीरांचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी केले आहे .

यावल शहर व परिसरातील लाभार्थ्यांनी आपल्या जवळच्या केंद्रातच उपस्थित राहावे.आधार रजिस्ट्रेशन न झाल्यास लाभ थांबण्याची शक्यता असल्याने प्रत्येक पात्र लाभार्थ्याने दिलेल्या वेळापत्रकानुसार शिबिरात उपस्थित राहून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करायला पाहिजे अशी माहिती यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी दिली आहे.