भुसावळ (प्रतिनिधी) : परतवाडा पोलिस स्टेशन येथे ७ एप्रिल २०२५ रोजी दाखल झालेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्यातील एक ईरानी आरोपी भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी अटक केला. आरोपीने फिर्यादी महिलेच्या गळ्यातील अंदाजे १ लाख १७ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून मोटारसायकलवरून पलायन केले होते.

या बाबत सविस्तर असे की ही घटना फिर्यादी महिलेच्या पतीसोबत मंदिरात जात असताना घडली. दोन अनोळखी इसमांनी अचानकपणे त्यांच्या गळ्यातील १८ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र हिसकावून धूम ठोकली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्यात आली.
या तपासाअंती, दि. ५ मे २०२५ रोजी परतवाडा (जि. अमरावती) येथील अधिकारी व कर्मचारी भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात आले असता, पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे. कॉ. विजय नेरकर, पो. कॉ. प्रशांत परदेशी, पो. कॉ. योगेश माळी, पो. कॉ. जावेद शहा, पो. कॉ. अमर आढळे, पो. कॉ. सचिन चौधरी आणि पो. कॉ. भूषण चौधरी यांच्या पथकाने संयुक्त कारवाई करत आरोपी मझर अब्बास जाफर ईरानी याला मुस्लिम कॉलनी, भुसावळ येथून ताब्यात घेतले.
या गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल दि. ५ एप्रिल २०२५ रोजी मुक्ताईनगर येथून चोरीस गेलेली असून, सदर वाहनाबाबत मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी ती मोटारसायकलही जप्त करून परतवाडा पोलिसांच्या ताब्यात दिली.


