भुसावळातील नोकरीच्या बहाण्याने फसवणूक प्रकरण : दोघांना अटक -फसवणुकीचा आकडा 25 लाखांवर : गुन्ह्यात चार संशयीतांची वाढ : आठ तक्रारदार समोर

भुसावळ (प्रतिनिधी) : रेल्वेत हेड क्लर्कची नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने भुसावळातील सेवानिवृत्त रेल्वे पोलिसाची नऊ लाख 64 हजार रुपयात फसवणूक करण्यात आली होती. याप्रकरणी प्रशांत लक्ष्मीनारायण अग्रवाल (गडकरी नगर, भुसावळ) यास अटक केल्यानंतर सुरूवातीला आरोपीला तीन दिवसांची व पुन्हा चार दिवसांची अर्थात 29 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.. दरम्यान, फसवणूक प्रकरणात चार संशयीत निष्पन्न झाले असून त्यातील दोघांना अटक करण्यात आली आहे तर दोघे पसार झाले आहे. आरोपींच्या विरोधात अन्य आठ तक्रारदार पुढे आल्यानंतर फसवणुकीचा आकडा 25 लाखांवर पोहोचल्याचे तपासाधिकार्‍यांनी सांगितले.

सेवानिवृत्त पोलिसाला गंडवले : आरोपीला कोठडी
रेल्वेतील सेवानिृवत्त पोलीस वसंत जानबाजी ढोणे (65, जुना टोल नाका, फेकरी) यांच्या मुलाला रेल्वेत हेड क्लर्कची नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने आरोपी प्रशांत अग्रवालने नऊ लाख 64 हजार रुपयात गंडवले होते. याप्रकरणी प्रशांत अग्रवाल यास अटक केल्यानंतर त्यास सुरूवातीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली व 25 रोजी कोठडीची मुदत संपल्यानंतर न्यायालयात हजर केल्यानंतर पुन्हा 29 पर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

गुन्ह्यात चार आरोपी वाढले
फसवणुकीच्या गुन्ह्यात तपासादरम्यान आरोपी प्रशांत अग्रवालची कसून चौकशी केल्यानंतर तसेच सुमारे आठ तक्रारदारांनी बाजारपेठ पोलीस ठाणे गाठून संशयीताने बाल संगोपन केंद्राद्वारे नोकरीचे आमिष दाखवत फसवणूक केल्याची तक्रार दिल्यानंतर संशयीत हर्षानी मेहता (गोलाणी कॉम्प्लेक्स, भुसावळ), आरोपी प्रशांत अग्रवालचा शालक राजवीर मोहन परदेशी (भुसावळ), मेघराज नारायणसिंग पाटील (साकरी, ता.भुसावळ), योगेश केशवप्रसाद तिवारी (सरस्वती नगर, भुसावळ) यांनाही गुन्ह्यात सह आरोपी करण्यात आले. आरोपी मेघराज पाटील व योगेश तिवारी यांना अटक केल्यानंतर पाटील यास 28 पर्यंत पोलीस कोठडी तर तिवारी यास न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड.लक्ष्मी पावरा तर संशयीतांतर्फे अ‍ॅड.सत्यनारायण आर.पाल यांनी बाजू मांडली.