नवे शैक्षणिक धोरण, विद्यार्थ्यांना इंटर्नशिपसाठी विद्यापिठातर्फे पोर्टल सुरू

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने नव्या शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना इंटर्नशिप संदर्भात माहिती मिळण्याकरीता इंटर्नशिप पोर्टलचा शुभारंभ व्यवस्थापन परिषद सदस्य नंदकुमार बेंडाळे यांच्या हस्ते दि. १५ एप्रिल रोजी करण्यात आला.

यावेळी कुलगुरू प्रा.व्ही.एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा.एस.टी. इंगळे, व्य.प. सदस्य राजेंद्र नन्नवरे, प्राचार्य महेंद्र रघुवंशी, प्रा. शिवाजी पाटील, अँड अमोल पाटील, नितीन झाल्टे,

प्राचार्य संजय सुराणा, प्रा. म.सु. पगारे, डॉ. पवित्रा पाटील, प्रा. सुरेखा पालवे, प्राचार्य जगदीश पाटील, प्राचार्य एस. एस. राजपूत, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, प्रा. योगेश पाटील, सीए रवींद्र पाटील हे उपस्थित होते.

राज्य शासनाने नवे शैक्षणिक धोरण २०२० लागू केले असून त्याची अंमलबजावणी विद्यापीठाने केली आहे. या धोरणा अंतर्गत विद्यार्थ्यांना इंटर्नशिप करणे अनिवार्य आहे. त्याअनुषंगाने विद्यापीठाच्या संगणकशाख प्रशाळेतील प्रा. मनोज पाटील व पध्दती विश्लेषक

डॉ. दाऊदी हुसेन यांनी या इंटर्नशिप पोर्टलची निर्मिती केली आहे. या पोर्टलवर उद्योजक यांनी त्यांच्या उद्योग व व्यवसायाची माहिती भरून नोंदणी करावयाची आहे. विद्यापीठ प्रशाळेतील विद्यार्थ्यांनी या पोर्टलवर प्रशाळेमार्फत नोंदणी करावयाची आहे. त्याअनुषंगाने विद्यार्थ्यांना इंटर्नशिपचे पर्याय उपलब्ध होणार आहेत. ही सुविधा प्राथमिक स्वरूपात विद्यापीठातील प्रशाळेतील विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे. अशी माहिती कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी दिली.