नाशिकमध्ये मध्यरात्री मोठा हिंसाचार500 पोलीस अन् जमाव 400 च्या वर, पोलिसांवर दगडफेक, वाहनांची तोडफोड ; अनधिकृत दर्गा हटवण्यावरून पसरली अफवा ;

नाशिक,

नाशिकमधून मोठी बातमी समोर येत आहे. नाशिकच्या काठे गल्ली परिसरातील अनधिकृत दर्गा तोडण्याआधी रात्रीच्यावेळी हिंसाचार झाला. पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. वाहनांची तोडफोड करण्यात आली. नाशिकमध्ये अनधिकृत दर्ग्याच्या ठिकाणी झालेल्या या दगडफेकीत 31 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. दगडफेक करणाऱ्या 15 लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 57 संशयास्पद मोटरसायकली पोलिसांकडून जप्त करण्यात आल्या आहेत.

दरम्यान परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला. पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी रात्री घडलेल्या घटनेची माहिती दिली. बांधकाम काढण्यासाठी पथक आलं होतं. मात्र याचवेळी एका जमावाने विरोध करण्यास सुरुवात केली. त्यांना समजावण्यासाठी दर्ग्याचे ट्रस्टी, प्रतिष्ठित नागरिक आले होते. मात्र त्यांनाही जुमानलं नाही. प्रतिष्ठित नागरिक आणि पोलिसांवर दगडफेक केली. काही गाड्याच नुकसान केलं. त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी सौम्य बळाचा वापर केला. सध्या परिस्थिती शांत आहे.

वीजपुरवठा खंडित असल्याचं पाहून जमावाने दगडफेक केली. वादग्रस्त धार्मिक स्थळाबाबत अफवा उडल्यानं तणाव निर्माण झाला होता. रात्रीच्या वेळी 500 पोलिसांचा बंदोबस्त होता. मात्र, जमाव 400 च्या वर होता. पालिकेने न्यायालयाच्या आदेशाने अनधिकृत दर्ग्याला 1 एप्रिलला नोटीस बजावली होती. स्वतःहून अनधिकृत बांधकाम काढून घ्या, अन्यथा तोडकामाचा इशारा दिला होता. नाशिक पोलिसांनी परिसरातील वाहतूक मार्गतही बदल केला आहे.