भुसावळ( प्रतिनिधी ) विनायक कॉलनीतील बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे ७३ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रेमनाथ शिवचरणदास गिनोत्रा (वय ६८, रा. विनायक कॉलनी, भुसावळ) हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला असून, २ एप्रिल ते ६ एप्रिल या काळात घर बंद होते. या कालावधीत चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि दागिने व रोख रक्कम असा एकूण ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. चोरीची घटना ६ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता उघडकीस आली.
घटनेची माहिती मिळताच प्रेमनाथ गिनोत्रा यांनी थेट भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाणे गाठले व तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरट्यांचा माग काढण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहेत.


