जळगाव : तालुक्यातील पाथरी येथून जळगाव येथे येत असताना दुचाकी आणि पिकअप यांचा भीषण अपघात गुरुवारी दि. १० एप्रिल रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास जळगाव तालुक्यातील वावडदा रस्त्यावर झाला आहे. यात २ जण जागीच ठार झाले असून १ जण गंभीर जखमी झाला आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला अपघात नोंद झाली आहे

भावेश गोरख पाटील (वय ३८), महेंद्र उर्फ योगेश वसंत जाधव (वय ३८, दोन्ही रा. पाथरी ता. जळगाव) असे मयत तरुणांचे नाव आहे. भावेश पाटील आणि महेंद्र जाधव हे गावातील संदीप शांताराम भील (वय ३५) याचेसोबत पाथरी येथून जळगाव येथे कामानिमित्त येत होते. गुरुवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास वावडदा गावाजवळ समोरून येणाऱ्या पिकअप यांनी त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेत भावेश पाटील हा जागीच ठार झाला तर आजूबाजूच्या ग्रामस्थांनी भावेश पाटील, महेंद्र जाधव, संदीप भिल यांना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून भावेश पाटील आणि महेंद्र उर्फ योगेश जाधव यांना मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला होता. तर संदीप भिल हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान भावेश पाटील यांच्या पश्चात आई असून तो एका खाजगी लक्झरी बसवर चालक म्हणून काम करीत उदरनिर्वाह करीत होता. तर महेंद्र जाधव यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार असून टेलर काम करून ते परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते.
दरम्यान, भावेश व महेंद्र यांच्या मृत्यूमुळे पाथरी गावावर शोककळा पसरली असून शासकीय रुग्णालयामध्ये ग्रामस्थांची मोठी गर्दी झालेली होती. या ठिकाणी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच रुग्णालयात जाऊन नातेवाईकांकडून घटनेची माहिती जाणून घेतली. या अपघातामुळे जळगाव तालुक्यात एकच शोककळा पसरली आहे.


