भुसावळ ( प्रतिनिधी ) – भुसावळ शहराने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच सलग दुसऱ्या दिवशी तापमानाचा उच्चांक गाठला असून मंगळवारी केंद्रीय जल आयोग कार्यालयात कमाल ४५.८ अंशावर तापमान नोंदविण्यात आले. आज बुधवार दिनांक ९ रोजी ढगाळ वातावरण निवळल्यानंतर सूर्य पुन्हा आग ओकू लागला आजही तापमान ४५.३ अंश नोंद झाली आहे .

भुसावळात एकाच दिवसात ०.६ अंश सेल्सिअसने तापमानात वाढ झाली. तापमानात सतत वाढ होत आहे. रविवार ६ एप्रिल रोजी ४४.३, सोमवार ७ एप्रिल रोजी ४५.२ तर मंगळवारी ८ एप्रिल रोजी यंदाच्या मोसमातील सर्वाधिक ४५.८ अंश सेल्सिअस तर बुधवार रोजी ४५.३ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली. सोमवार ७ एप्रिल रोजी यंदाच्या मोसमातील सर्वाधिक तापमानाची ४५.२ अंश सेल्सिअस)ळ नोंद झाली होती. एकाच दिवसात हा उच्चांक मोडला असून मंगळवारी ४५.८ अंश सेल्सिअस इतके तापमान होते. नागरिकांनी उन्हापासून स्वतःची काळजी घ्यावी. गरज नसेल तर घराबाहेर पडू नये. घराबाहेर पडल्यास पांढऱ्या व सुती कपड्यांचा वापर करावा भरपूर पाणी प्यावे , असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
महाराजबाग प्राणिसंग्रहालयात वन्यजीवांची विशेष खबरदारी
सध्या विदर्भातील अकोला शहराचे तापमान हे 44 अंश सेल्सिअसच्या वर आहे. तर नागपूरमध्ये देखील पारा 42 अंश सेल्सिअसच्या घरात आहे. याचा फटका नागपूरच्या महाराजबाग प्राणीसंग्रालयातील वन्य प्राण्यांनादेखील सहन करावा लागत आहे. उन्हामुळे वन्यप्राण्यांना देखील उष्मघाताचा धोका जाणवत असतो. त्यामुळे या उन्हाच्या तडाख्यापासून वन्यप्राण्याचा बचाव व्हावा, यासाठी महाराजबाग प्राणीसंग्रालय प्रशासनाने बिबट,अस्वल व पक्षी यांच्या पिंजऱ्यात कुलर लावले आहे. पिंजऱ्याच्या अवतिभवती ग्रीनेट लावून वरच्यावर पाण्याची फवारणी केली जात आहे. वाघांसाठी पाण्याचे पाँड तयार करण्यात आले असून सर्व प्राण्यांच्या आहाराची विशेष काळजी घेतली जात असल्याचे तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित मोटघरे यांनी सांगितले.
जंगलातील पानवठे आटले, वन्यप्राण्यांची लोकवस्तीकडे धाव
उन्हाळ्याच्या दिवसात तापमान वाढीमुळे बुलढाण्यातील दाट जंगलातील पानवठे आटले आहेत आणि त्यामुळे दाट जंगलातील हिंस्र प्राणी हे पाण्याच्या शोधात गावाकडे येताना दिसत आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील आंबाबारवा अभयारण्यातील हिंस्र प्राणी आता पर्यटकांना ही सहज दिसू लागले आहेत. आंबा बरवा अभयारण्यात सध्या 18 वाघ असून अस्वल,रानगवे हे सुद्धा सहज आता दिसायला लागले आहेत. दररोज पर्यटक आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात एरवी न दिसणाऱ्या या हिंस्र प्राण्याच्या छबी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद करत आहेत. तर एका पर्यटकांनी साळीदर (Porcupine) या प्राण्याचे शिकार करताना वाघाला आपल्या कॅमेरात कैद केला आहे.


