भुसावळ (प्रतिनिधी ) –

भारत सरकारच्या युवा कार्य व क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षा निखिल खडसे यांनी भुसावळ मंडळातील विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयात एक उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. या बैठकीस विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इति पाण्डेय तसेच सर्व वरिष्ठ विभागीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. या बैठकीत रावेर लोकसभा मतदारसंघाशी संबंधित विविध रेल्वे प्रकल्पांच्या कामांची सविस्तर माहिती घेण्यात आली.
या बैठकीदरम्यान डीआरएम श्रीमती इति पाण्डेय यांनी संपूर्ण मंडळात चालू असलेल्या व पूर्ण झालेल्या पायाभूत सुविधा विकासकामांची माहिती राज्यमंत्री महोदयांना दिली. प्रवासी सुविधांचा विकास, अधोसंरचनेत सुधारणा व स्टेशन विकास यावर विशेष भर देण्यात आला.
बैठकीत दोन महत्त्वाच्या गाड्यांच्या थांब्यांसाठी मंजुरी देण्यात आल्याचे सांगण्यात आले – गाडी क्र. 01211/01212 (बडनेरा – नाशिक मेमू) ला बोदवड व वरणगाव स्थानकांवर थांबा, तसेच गाडी क्र. 22221/22222 (मुंबई–निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस) ला भुसावळ स्थानकावर थांब्याची मंजुरी देण्यात आली आहे.
गाडी क्र. 12112 (अमरावती एक्सप्रेस) मध्ये आरक्षणासाठी बर्थ वाढविण्यात आली आहे. अमरावती येथून सुटणाऱ्या या गाडीमध्ये 1AC साठी 2, 2AC साठी 12 आणि स्लीपरसाठी 30 अतिरिक्त बर्थ उपलब्ध करण्यात आले आहेत. भुसावळ येथून 4 स्लीपर बर्थ वाढविण्यात आले आहेत.
या बैठकीचा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बिस्वा ब्रीज दि. १ मार्च २०२५ रोजी पूर्ण झालेला आहे.
दुसखेड़ा येथील LHS क्र. १५७ जवळील झाडझुडप हटविणे व अप्रोच रस्त्याचे डागडुजीचे काम पूर्ण झाले आहे. भादली व बोदवड येथील RUB मध्ये प्रकाशयोजना कार्यरत आहे. सावदा रेल्वे उड्डाणपूल मध्ये विद्युत उपकरणाची वारंवार चोऱ्या झाल्याने पुन्हा दिवे बसविण्यात आले आहेत.
पाचोरा–जामनेर–बोदवड रेल्वे मार्गावरील पहुर स्थानकावर मालधक्का उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तसेच जालना –जळगाव रेल्वेमार्ग हा पाचोरा–जामनेर मार्गाला 30.5 मीटर रेल ओव्हर रेल (ROR) च्या माध्यमातून ओलांडेल. हा ROR नवीन पहुर स्थानकापासून सुमारे 1.2 किमी अंतरावर असेल.
लेव्हल क्रॉसिंग संदर्भात, मलकापूर–वडोदा दरम्यानच्या LC क्र. 13 वर जलजमाव व खड्डे दूर करत रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. LC क्र. 19 (नांदुरा यार्ड) येथे 5×2.5 मीटर पादचारी अंडरपास मंजूर झाला असून त्याचे काम लवकरच सुरू होणार आहे.
LC क्र. 20 (नांदुरा) येथे प्रस्तावित ROB साठी रचना MoRTH च्या मुख्य अभियंत्यांनी मंजूर केली असून NH-PWD अकोला यांनीही मान्यता दिली आहे. स्थळ सर्वेक्षण पूर्ण झाले असून MRIDCL कडून GAD मंजुरी अपेक्षित आहे. या ROB सोबत एक Subway सुद्धा प्रस्तावित आहे.
भुसावळ–जेएनपीटी दरम्यान कंटेनर रेल्वे वाहतुकीच्या शक्यतेबाबत चर्चा करण्यात आली. भुसावळ CRT ला कंटेनर वाहतुकीसाठी अधिसूचित करण्यात आले असून इच्छुक व्यापाऱ्यांनी लोडिंगसाठी इंडेंट नोंदणी करू शकतात. सद्यस्थितीत अंदाजे १५०० केळी कंटेनर रस्तेमार्गे जात आहेत.
कर्मचारी कल्याणाशी संबंधित मुद्द्यांमध्ये, स्थानांतर विनंतींसंदर्भातील प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. मंडळाने यावर त्वरित कारवाई केल्याबद्दल मंत्री महोदयांनी समाधान व्यक्त केले.
भुसावळ कॉर्ड लाईनवर नवीन प्रवासी प्लॅटफॉर्म उभारणीसाठी केलेल्या संयुक्त स्थल सर्वेक्षणात तांत्रिकदृष्ट्या कॉर्ड लाईन क्र. 2 वर प्लॅटफॉर्म उभारणे शक्य असल्याचे निष्पन्न झाले असून त्याचा प्रस्ताव मुख्यालयास पाठविण्यात आला आहे.
KAVACH, MTRC व इतर सुरक्षा संबंधित एलटीई आधारित कम्युनिकेशनसाठी नवीन EPC (Evolved Packet Core) व कंट्रोल कमांड सेंटर भुसावळ येथे उभारण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.
मेमू गाड्यांच्या देखभाल सुविधेसाठी 08/2021 मध्ये मंजुरी मिळालेली असून यामध्ये 450×15 मीटर निरीक्षण पीट, 110×15 मीटर हेवी रिपेअर शेड, कार्यालयीन इमारत, कर्मचाऱ्यांचे विश्रांतिकक्ष व व्हील लेथ यांचा समावेश आहे. सदर काम प्रगतीपथावर असून यावर्षी पूर्ण होण्याची शक्यता आहे.
जळगाव जिल्ह्यातील LC क्र. 3, 4, 5, 171 आणि 162 तसेच LC क्र. 20 (नांदुरा) येथील ROB व LHS संदर्भातील कामांची माहितीही मा. राज्यमंत्री महोदयांना देण्यात आली.
मा. मंत्री महोदयांनी सर्व प्रगतीशील कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले तसेच प्रवाशांच्या सुविधा आणि पायाभूत सुविधांच्या विकासावर विशेष भर देण्याचे आवाहन केले.
या बैठकीस अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (प्रशासन) श्री. सुनील कुमार सुमन, अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (तांत्रिक) श्री. एम. के. मीणा आणि सर्व वरिष्ठ विभागप्रमुख उपस्थित होते.



