मिशन ३००० मेट्रिक टन योजनेत भुसावळ विभागाचा सिंहाचा वाटा ; उच्चतम आरओएच शेड्यूल संख्येची नोंद ;

भुसावळ (प्रतिनिधी नभारतीय रेल्वेच्या मालवाहतुकीतील कार्यक्षमता वाढवण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या मिशन ३००० मेट्रिक टन योजनेअंतर्गत भुसावळ विभागाने उल्लेखनीय यश मिळवले आहे. कॅरेज आणि वॅगन (C&W) म्हणजेच यांत्रिक विभाग भुसावळ येथे कार्यरत असलेल्या मालगाडी परीक्षण यार्ड आणि आरओएच डेपोमध्ये मालवाहतूक वॅगनच्या देखभाल व परीक्षणाची जबाबदारी पार पाडली जाते. त्यामुळे मालगाड्यांची कार्यक्षमता आणि विश्वासार्हता मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

भुसावळ C&W विभागाने मालगाड्यांच्या देखभालीत ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. मार्च 2025 मध्ये सर्वाधिक एकूण 702 वॅगनचे आरओएच (ROH) यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले. ही संख्या फेब्रुवारी 2025 मध्ये झालेल्या 521 वॅगनच्या तुलनेत 34.7% अधिक असून, मार्च 2024 मध्ये झालेल्या 441 वॅगनच्या तुलनेत 59.1% अधिक आहे. ही वाढ विभागाच्या सातत्यपूर्ण परिश्रमाचे द्योतक आहे.

भुसावळ विभागातील CC मालगाडी रेक होल्डिंग आणि परीक्षणात मोठी वाढ

भुसावळ विभागातील कंटिन्युअस चेक (CC) मालगाडी रेक संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मार्च 2024 मध्ये 133 असलेली CC मालगाडी रेक संख्या मार्च 2025 मध्ये 238 वर पोहोचली आहे, जी 78.94% वाढ दर्शवते. या यशामुळे अधिकाधिक मालगाड्या मालवाहतुकीसाठी उपलब्ध होऊन, रेल्वेच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली आहे.

वार्षिक CC रेक परीक्षण उच्च स्तरावर

वर्ष 2024-25 मध्ये एकूण 1,689 CC मालगाडी रेक परीक्षणे पूर्ण करण्यात आली. याच्या तुलनेत 2023-24 मध्ये 1,271 CC रेक परीक्षणे झाली होती. ही वाढ 32.88% अधिक असून, मालवाहतूक सुरक्षितता आणि विश्वासार्हतेसाठी भुसावळ विभागाने केलेल्या अथक प्रयत्नांचे प्रतिबिंब आहे.

ही सर्व महत्त्वाची उपलब्धी रेल्वे वाहतूक सुधारण्यासोबतच, रेल्वेच्या उत्पन्नात भर घालून मालवाहतूक वॅगनच्या देखभालीत नवीन मापदंड प्रस्थापित करण्यास मदत करेल. या यशामुळे भुसावळ विभागाने भारतीय रेल्वेच्या कार्यक्षमतेत मोठे योगदान दिले आहे.

ही उल्लेखनीय उपलब्धी मंडल रेल प्रबंधक श्रीमती इति पांडे आणि प्रधान मुख्य यांत्रिक अभियंता सुबोध कुमार सागर यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली प्राप्त झाली आहे. तसेच, वरिष्ठ मंडल यांत्रिक अभियंता रोहित राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहायक मंडल यांत्रिक अभियंता अमित वाघ यांच्या सक्रिय सहभागाने ही कामगिरी शक्य झाली आहे. विशेषतः, परिचालन, वाणिज्य, सामुग्री, इलेक्ट्रिकल आणि कार्मिक विभागाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हे यश शक्य झाले आहे.

या ऐतिहासिक यशामध्ये सर्व श्रेणीतील कर्मचारी आणि अभियंत्यांनी मोलाची भूमिका बजावली असून, त्यांच्या अथक परिश्रमामुळे भुसावळ विभाग भारतीय रेल्वेच्या मिशन ३००० मेट्रिक टन योजनेत आघाडीवर आहे. भुसावळ विभागाच्या या प्रगतीमुळे भारतीय रेल्वेच्या मालवाहतुकीच्या विश्वासार्हतेत लक्षणीय वाढ झाली आहे.