अमळनेर –

अमळनेर पोलिसांनी जळोद रस्त्यावरील उड्डाणपुलाजवळ मोठी कारवाई करत ५६ किलो ९७० ग्रॅम गांजासह दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत वाहनासह एकूण १९.३९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, पोलिसांनी एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
जळोद मार्गे अमळनेर कडे एका पांढऱ्या रंगाच्या बोलेरो गाडी क्रमांक MH 19 AJ 0223 या वाहनातून अवैधरित्या गांजाची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यावरून या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई २८ मार्च रोजी रात्री १०.५० वाजता करण्यात आली, पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी , अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर , उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली यावरून पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर , पोलीस हेड कॉन्स्टेबल मिलिंद सोनार, पोलीस कॉन्स्टेबल निलेश मोरे, विनोद संदानशिव, प्रशांत पाटील, उज्वल मस्के, गणेश पाटील अशांना छापा टाकण्याचे व कायदेशीर प्रक्रिया करण्याची आदेश दिले.यानुसार छापा टाकण्यात आला यावेळी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा उपस्थित होते .
झडतीदरम्यान गाडीमध्ये १८ पॅकेटमध्ये भरलेला ओलसर गांजा सापडला, ज्याचे वजन ५६ किलो ९७० ग्रॅम असून किंमत सुमारे ११ लाख ३९ हजार रुपये आहे. यासोबतच बोलेरो वाहनाची किंमत ८ लाख रुपये असल्याने एकूण जप्त मुद्देमाल १९.३९ लाख रुपये एवढा झाला आहे.
या प्रकरणात संशयीत आरोपी मनोज सोनू पावरा (२४, महादेव सोनपाडा, ता. शिरपूर) आणि सीताराम वेळू सोनवणे (५२, वलवाडी, जि. बडवाणी, मध्यप्रदेश) यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींच्या विरुद्ध अंमळनेर पोलीस स्टेशनला पोलीस हेड कॉन्स्टेबल मिलिंद सोनार यांच्या फिर्यादवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक१२३/२०२५ NDPS कायदा १९८५ अंतर्गत कलम ८ ,२० , २२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक नामदेव बोरकर करत आहेत..


