रेल्वे आरक्षणच्या ई-तिकिटांचा अवैध काळाबाजार केल्या प्रकरणी तरुणाला अटक –

पोलिसांनी केली ४ लाखाची तिकिटे, मोबाईल जप्त ; चाळीसगावात गुन्हा नोंद
जळगाव (प्रतिनिधी) : पुणे सायबर सेलने रेल्वे आरक्षण ई-तिकिटांच्या अवैध व्यवहाराचा पर्दाफाश केला आहे. संशयास्पद युजर आयडीच्या मदतीने तिकिटे बनविणाऱ्या संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. वरिष्ठ मंडल सुरक्षा आयुक्त, भुसावळ यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली.

संशयित आरोपीचे नाव ज्ञानेश्वर गुलाब पाटील (वय ३८,वर्षे, रा. मुकटी, ता. धुळे) असे आहे. बुधवार दि. २६ रोजी पुणे सायबर सेलकडून रेल्वे आरक्षण ई-तिकिटांच्या काळाबाजारामध्ये संलग्न असलेल्या संशयिताबाबत माहिती मिळाली.(केसीएन) त्यानुसार रेल्वे संरक्षण दल चौकी, धुळे अंतर्गत चाळीसगाव येथे गुन्हा नोंदवण्यात आला. विशेष तपास पथकाने आरोपीकडून २४३ ई-तिकिटे जप्त केली आहेत. या तिकीटांची एकूण किंमत ४ लाख २० हजार ९६२ रुपये आहे. यात ८८ आगाऊ प्रवासाची तिकिटे, ज्याची किंमत १ लाख ७८ हजार २१३ आणि १५५ प्रवास पूर्ण झालेली तिकिटे ज्याची किंमत २ लाख ४२ हजार ७४८ रुपये आहे.

तसेच, अवैध तिकिट बुकिंगसाठी वापरलेला रेडमी कंपनीचा मोबाइल फोन देखील जप्त करण्यात आला आहे.(केसीएन) याप्रकरणी संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून नोटीस देऊन त्याला सोडण्यात आले आहे. ही कारवाई निरीक्षक, चाळीसगाव यांच्या नेतृत्वाखाली, एसआयपीएफ आर. के. सिंग, राजेंद्र भामरे व आरक्षक राकेश खलाणे यांच्या विशेष पथकाने केली. सहायक उपनिरीक्षक राजेंद्र भामरे हे पुढील तपास करीत आहेत.