तळवेलला महिला दिनानिमित्त रंगला सांस्कृतीक कार्यक्रम ;


( सरपंच विद्या भारसके यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला महीलांचा प्रचंड प्रतिसाद )


वरणगाव ता . भुसावळ । प्रतिनिधी ।

जागतिक महिला दिनानिमित्त तळवेल येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत सरपंच विद्या भारसके यांनी महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते . या कार्यक्रमाला लहान मुली व महिलांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिल्याने कार्यक्रमाला चांगलीच रंगत आली होती . यामुळे महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे .

वरणगाव पासुन जवळच असलेल्या तळवेल येथे सरपंच विद्या उल्हास भारसके, उपसरपंच सुवर्णा अमोल पाटील व महिला ग्रामपंचायत सदस्या यांच्या संयुक्त विद्यमाने जागतीक महिला दिनानिमित्त जिल्हा परिषद मराठी मुलींच्या शाळेत सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . या कार्यक्रमाचे उद्घाटन नायब तहसीलदार पुजा अवघडे तसेच मंडळाधिकारी रजनी तायडे यांच्या हस्ते करण्यात आले . तर प्रमुख पाहुणे म्हणून अरुणा इंगळे ( माजी नगराध्यक्षा, वरणगाव ), चारुलता सुशिल पाटील ( संचालिका , स्वास्तिक रिसॉर्ट ), डॉ . अनुजा भोईटे, मंगला झोपे ( माजी सभापती पं . स . भुसावळ ), इंदिराताई पाटील ( माजी सरपंच तळवेल ), योगीता सोनार , प्रतिभा तावडे यांना आमंत्रित करण्यात आले होते . यावेळी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात गावातील मुली तसेच महिलांनी सहभाग घेवून समाज प्रबोधनपर नाटीका, न्यृत्य, लेझीम अशा विविध विषयांवर सांस्कृतिक सहभाग नोंदवला होता . यामुळे कार्यक्रमाला गावातील महिला व मुलींची संख्या मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती . कार्यक्रमात सहभागी झालेल्या अनुक्रमे पाच महिलांना पैठणी साडी तर इतर महिलांना बाथरूम किट बक्षीस देण्यात आले . कार्यक्रमाचे पर्यवेक्षिका म्हणून जि . प शाळेच्या शिक्षीका कांती सुरवाडे, मिना दुपारे , निलीमा पाटील( टहाकळी ), रोशनी कोल्हे ( सुरवाडे ता . भुसावळ ), दिपमाला कोल्हे ( तळवेल ) यांनी कामकाज पाहीले . तर सर्व उपस्थित सर्व मान्यवरांचा सरपंच, उपसरपंच व महिला ग्रामपंचायत सदस्यांनी सत्कार केला . तळवेल गावात प्रथमच झालेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिभा तावडे यांनी तर आभार प्रदर्शन जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका किरण अहीर यांनी व्यक्त केले . तर गावात जागतीक महिला दिनाच्या निमित्ताने प्रथमच झालेल्या या सांस्कृतिक कार्यक्रमामुळे महिला व मुलींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे .