रिक्षेत बसवून महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावणारे तिघं जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात;

१ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत; सीसीटीव्ही व गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई ; 


जळगाव ( प्रतिनिधी ):बाजार करून पायी घरी जात असलेल्या महिलेला रिक्षेत बसवून तिच्या गळ्यातील सोन्याची पोत जबरदस्तीने हिसकावून नेणाऱ्या तिघांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. आरोपींकडून सोन्याचे मंगळसूत्र व गुन्ह्यात वापरलेली रिक्षा असा एकूण १ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ४ वाजता फिर्यादी महिला बाजार करून घरी पायी जात असताना दगडी पुलाजवळील म्हसोबा मंदिर परिसरात एक रिक्षा त्यांच्याजवळ आली. रिक्षाचालकाने “तुम्हाला घरी सोडतो” असे सांगितल्याने महिला रिक्षाच्या मागील बाजूस बसल्या. त्यावेळी रिक्षेतील दोन अनोळखी इसमांनी महिलेच्या गळ्यातील अंदाजे २.५ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत जबरदस्तीने हिसकावून नेली. या प्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. २००/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०९(४), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन जळगावचे पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना गुन्ह्याचा समांतर तपास करून आरोपींचा शोध घेण्याच्या तसेच मुद्देमाल हस्तगत करण्याच्या सूचना दिल्या.त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी तसेच तांत्रिक तपास सुरू केला. त्याचबरोबर गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यात आला.
      मिळालेल्या माहितीनुसार पथकाने मुकेरिया हॉटेल, नशिराबाद परिसरातून तिघांना ताब्यात घेतले. त्यांची नावे वसीम शेरअली तेली (वय ३८, रा. फातेमा नगर, एमआयडीसी, जळगाव), अरबाज खान अय्युब खान (वय २६, रा. शिवाजीनगर चौक, जळगाव) आणि वसीम अजमल खान (वय ३६, रा. साती मजार, नशिराबाद) अशी आहेत. पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपींनी सदर गुन्ह्यात सहभाग असल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्या ताब्यातून २.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे पेंडल व काळे मणी असलेले मंगळसूत्र, किंमत अंदाजे २५ हजार रुपये, तसेच गुन्ह्यात वापरलेली तीनचाकी रिक्षा क्रमांक MH-19-V-6563, किंमत अंदाजे १ लाख रुपये, असा एकूण १ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपींचा पूर्वगुन्हेगारी तपशील
पोलिसांच्या माहितीनुसार, वसीम शेखअली तेली याच्याविरुद्ध एमआयडीसी जळगाव व रामानंदनगर पोलीस ठाण्यात चोरी व जबरी चोरीसह तीन गुन्हे दाखल आहेत. तसेच वसीम अजमल खान याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक  संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी ज नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

कारवाईत पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे, पोहेकॉ अकरम शेख, किशोर पाटील, संदीप चव्हाण, गोपाळ गव्हाळे, विकास सातदिवे, उमाकांत पाटील, तसेच पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत परदेशी आणि राहुल वानखेडे यांच्या पथकाने सहभाग घेतला.