वरणगाव नजिक शेतातील कडब्याच्या गंजीला आग , २५ हजाराचे नुकसान

( नगर परिषदेच्या बंबावर शेतकऱ्यांनी सक्रीय होवून विझवली आग )


वरणगाव । प्रतिनीधी ।

वरणगाव नजिक विज वाहक तार तुटल्याने एका शेतातील कडब्याच्या गंजीला आग लागली . हा प्रकार लक्षात येताच परिसरातील शेतकऱ्यांनी धावपळ करीत नगर परिषदेच्या अग्निशामक बंबाद्वारे आग आटोक्यात आणली . यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे गहु पिकाचे होणारे नुकसान टळले . अन्यथा मोठा अनर्थ झाला असता .

याबाबत सविस्तर माहिती अशी की उमेश जनार्दन चौधरी यांच्या गट क्र .१६४ मधील शेतात त्यांनी ज्वारीच्या सुमारे ९०० पेढ्यांची गंजी लावून ठेवली होती . मात्र, मंगळवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास शेतातून गेलेली विज वाहक तार अचानक कडब्याच्या गंजीवर तुटून पडल्याने कडब्याच्या गंजीला आग लागली . याची माहिती पसरताच परिसरातील शेतकरी व शेत मालक यांनी वरणगाव नगर परिषदेच्या अग्नीशामक बंबास पाचारण केले . मात्र, या अग्नीशामक बंबावर चालका शिवाय दुसरा कुणीही कर्मचारी नसल्याने शेतकऱ्यांनी स्वतः धावपळ करीत आग आटोक्यात आणली . अन्यथा परिसरातील शेतकऱ्यांचा कापणीवर आलेल्या गहु पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असते . तर या घटनेबाबत वरणगावचे प्रभारी तलाठी मंगेश परिसे यांनी अंदाजे २५ ते ३० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा पंचनामा केला आहे .


अग्नीशामक बंब ठरतोय निकामी

वरणगाव नगर परिषदेच्या माध्यमातून शहर व परिसरातील आग आटोक्यात आणण्यासाठी एक मोठा व एक लहान चारचाकी वाहन तसेच दोन दुचाकी अग्निशामक वाहन आणले आहेत . मात्र, या अग्नीशामक बंबाच्या वाहनांवर एकही प्रशिक्षीत कर्मचारी नसल्याने आग आटोक्यात आणणे शक्य होत नाही . याचा अनुभव शहरात नुकत्याच लोककल्याण रुग्णालयालगत असलेल्या पाच दुकानांना लागलेल्या आगी प्रसंगी शहरवासीयांना आला आहे . यावेळी आयुध निर्माणी वरणगावचे दोन तर दिपनगर येथील एक अग्नीशामक बंब वेळेवर पोहचल्याने आटोक्यात आली . अन्यथा या ठिकाणीही मोठा अनर्थ झाला असता यामुळे वरणगाव नगर परिषदेचा अग्निशामक विभाग केवळ नावालाच असल्याचे दिसून आल्याने नागरीकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे .