तिढा सुटला ! : गिरीशभाऊंकडेच नाशिकचे पालकमंत्रीपद ? –

नाशिक : नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटल्याचे संकेत असून हे पद पुन्हा संकटमोचक गिरीश महाजन यांच्याकडेच राहण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन हेच होणार आहेत. सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या दृष्टीने नियोजन आणि प्रशासकीय समन्वय राखण्यासाठी भारतीय जनता पक्षाने (भाजप) हे पद स्वतःकडेच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकच्या पालकमंत्रीपदावर दावा कायम ठेवला होता. आणि आता अखेर भाजपाकडेच नाशिकचं पालकमंत्री पद राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 2 वर्षानंतर सिंहस्थ कुंभमेला होणार असून, त्याअनुषंगाने सर्व तयारीसाठी भाजप हा पालकमंत्री पद स्वत:कडेच ठेवणार असल्याचं समजतं. महाजन यांच्याकडे यापूर्वीही पालकमंत्रीपदाची जबाबदारी होती आणि त्यांनी त्या काळात घेतलेल्या निर्णयांमुळे भाजपमध्ये त्यांना हे पद पुन्हा देण्यावर एकमत झाले आहे.

दरम्यान, रायगडच्या पालकमंत्री पदाचा निर्णय मात्र अद्यापही रखडलेलाच आहे. कोणत्या पक्षाकडे हे पद जाईल, याबाबत महायुतीमध्ये अजूनही स्पष्टता नाही. शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) या दोन्ही पक्षांनी हे पद मिळावे म्हणून जोर लावला आहे. त्यामुळे रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा कधी सुटतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.