जळगाव – गेमींग वेबसाईटवर ऑनलाईन अंदर- बाहर खेळात तब्बल सात लाख जिंकल्याचा बहाणा करत खेळणार्याच्या खात्यात रक्कम जमा केली. यामुळे विश्वास बसल्याने अधिक पैसा कमविण्याच्या अमिषाने शासकीय कॉन्ट्रक्टरला सायबर ठगांनी तब्बल 78 लाख 90 हजार 500 रुपयांचा गंडा घातल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.

27 वर्षीय तरुण शासकीय कॉन्ट्रॅक्टर आहेत. ते जळगाव जिल्ह्यात पाचोरा तालुक्यातील रहिवासी आहेत. 3 नोव्हेंबर 2024 ते 12 जानेवारी 2025 दरम्यान त्यांच्याशी तीन अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या मोबाइलवर संपर्क साधला. गेमींग वेबसाईटवर ऑनलाईन अंदर बाहर व अंदर बाहर 2 हे गेम खेळल्यास तुम्ही मोठ्या प्रमाणात पैसे जिंकू शकता, असे अमिष दाखविले.
कॉन्ट्रॅक्टरने हा खेळ खेळण्यास सुरुवात केली.त्यानंतर अल्पकाळातच या खेळात ते जिंकल्याचे भासवित त्यांच्या बँक खात्यामध्ये सात लाख रुपये जमा केले. अधिक नफा मिळविण्याच्या अमिषाने अधिक पैसे गुंतवणूक करा, असा सल्ला सायबर ठगांनी दिला. तक्रारदार अंदर- बाहर गेम खेळत गेला. त्याबरोबरच बँक खात्यातील रक्कमही गमावत गेला. तब्बल 78 लाख 90 हजार 500 रुपये ऑनलाईन नेटबँकींगव्दारे वेगवेगळ्या बँक खात्यात स्विकारुन आर्थिक फसवणूक केली. सायबर ठगांनी फसवणूक केल्याची खात्री झाल्यानंतर शासकीय कॉन्ट्रॅक्टरने सायबर पोलीस ठाणे गाठुन कैफियत मांडली. या प्रकरणी रविवार, 19 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक सतीश गोराडे हे करीत आहेत.


