रेल्वे आरक्षित ई-तिकिटांच्या अवैध व्यापार ; अकोला आरपीएफची कारवाई : एका विरुद्ध गुन्हा दाखल ;

भुसावळ – “ऑपरेशन उपलब्ध” अंतर्गत मुख्यालयाकडून मिळालेल्या सूचनांनुसार, संशयित व्यक्तींच्या हालचालींची चौकशी करण्यासाठी अकोला आरपीएफला विशेष आदेश प्राप्त झाले. या आदेशाच्या आधारे, तपास अधिकारी आर.एल. गुर्जर व आरक्षक संदीप वानखडे यांनी दिनांक 19 नोव्हेंबर 2024 रोजी अकोल्यातील सुहास भास्करराव पाटील (वय 46 वर्षे) याच्या निवासस्थानी जाऊन तपास सुरू केला.

आरोपी घरात उपस्थित नसल्याने त्याच्या घरी नोटीस बजावण्यात आली. नोटीस मिळाल्यानंतर आरोपी आरपीएफ, अकोला येथे हजर झाला. चौकशी दरम्यान, मुख्यालयाकडून प्राप्त संशयित युजर आयडी तपास पत्रामध्ये आरोपीचे नाव व पत्ता योग्य असल्याचे आढळले.

आरोपीकडे एजंट आयडी व वैयक्तिक युजर आयडीविषयी विचारणा करण्यात आली असता, त्याने अधिकृत एजंट आयडी तसेच स्वतःच्या वैयक्तिक युजर आयडीचा वापर केल्याची कबुली दिली. पंचांसमोर आरोपीच्या आयआरसीटीसी पोर्टलवरील तपासणी दरम्यान, 14 जुनी व 1 लाईव्ह ई-रेल आरक्षण तिकिटे (एकूण 15 तिकिटे) हस्तगत करण्यात आली. या तिकिटांची एकूण किंमत ₹44,826.25 इतकी होती.

तसेच, आरोपीच्या ताब्यातून एक ब्लॅक सॅमसंग मोबाईल (अंदाजे किंमत ₹7,000) जप्त करण्यात आला. या मोबाईलचा वापर अवैध तिकिट व्यवसायात होत असल्याचे उघड झाले. पंचांसमोर तपास व जप्ती पंचनामा पूर्ण करून, आरोपीने स्वतःच्या युजर आयडीच्या माध्यमातून गरजू प्रवाशांसाठी रेल्वे तिकिटे तयार करून प्रत्येकी ₹100 अतिरिक्त शुल्क आकारल्याचे मान्य केले.

आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर आरपीएफ, अकोला येथे त्याच्याविरुद्ध गुन्हा क्र. 1069/2024 अंतर्गत रेल्वे अधिनियमाच्या कलम 143 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक सुरक्षा निरीक्षक करत आहेत.

रेल्वे प्रशासनाची प्रवाशांना विनंती:
रेल्वे प्रशासन प्रवाशांना विनंती करते की, त्यांनी केवळ अधिकृत वेबसाईट माध्यमांद्वारे तिकिटे बुक करावी. तसेच, कोणत्याही अवैध व्यवहाराची माहिती तातडीने आरपीएफला द्यावी. रेल्वे प्रशासन प्रवाशांना सुरक्षित व पारदर्शक सेवा देण्यासाठी सदैव कटिबद्ध आहे.