नाशिक, – महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरु आहे. आज राज्यातील निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. नाशिकमधील एका नामांकित हॉटेलमध्ये कोट्यवधीचे घबाड सापडले आहे. निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने ही कारवाई केली आहे. यात पाच कोटीहून अधिक रक्कम असल्याची माहिती समोर आली आहे.

यावेळी एका राजकीय पक्षाच्या नेत्यासह गाडी जप्त करण्यात आली आहे. नाशिकमधल्या या नामांकित हॉटेलमध्ये शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या नावे दोन खोल्या बूक आहेत. एका काळ्या रंगाच्या कारमध्ये या रोकडच्या बॅगा सापडल्या आहेत. पाच कोटींपैकी 2 कोटी जप्त केले असून, उर्वरित पैशांचा शोध सुरू आहे सध्या सुरु आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशीच निवडणूक आयोगाने मोठी कारवाई केली आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी नवी मुंबई पोलिसांकडून तब्बल 8476 किलो चांदी जप्त करण्यात आली. इतक्या जास्त मोठ्या प्रमाणात चांदी पाहून अधिकारी देखील चक्रावले. नवी मुंबईत पोलिसांनी मोठी कारवाई करत एका ट्रकमधून ही चांदी जप्त केली. पोलिसांकडून जप्त करण्यात आलेल्या या चांदीची किंमत बाजार भावाप्रमाणे तब्बल 80 कोटी असल्याचे देखील सांगितले जाते. महाराष्ट्रातील निवडणुकीच्या अनुषंगाने रोख रक्कम आणि अवैध मालमत्तेच्या वाहतुकीवर विशेष लक्ष ठेवले जाते. मिळालेल्या माहितीनुसार, मानखुर्द वाशीमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे.


