फैजपूर नगरीत स्वयंभू पांडुरंग रथोत्सवासाठी लोटला भक्तांचा जनसागर –


फैजपूर – फैजपूर शहरातील संत खुशाल महाराज देवस्थानच्या साक्षात असलेल्या पांडुरंगाचा रथोत्सव शुक्रवारी त्रिपुरारी पौर्णिमेच्या पावन पर्वावर उत्साहात व भक्ती भावात साजरा करण्यात आला. शतकोत्तर अमृत महोत्सवी वर्ष साजरा करणार्‍या रथोत्सवाचे यंदाचे 176 वर्ष होते. स्वयंभू पांडुरंगाचा जयघोष करीत भक्तांच्या प्रचंड उत्साहात सायंकाळी पाच वाजता रथोत्सवाला सुरुवात झाली.

स्वयंभू पांडुरंग भक्तांच्या भेटीला
स्वयंभू पांडुरंग रथावर विराजमान होऊन भक्तांच्या भेटीला आले व भक्तांनी सुद्धा ‘याची देही, याची डोळा डोळा’ स्वयंभू पांडुरंगाचे डोळे भरून दर्शन घेतले. रथ गल्लीतील खुशाल महाराज देवस्थानात तसेच फुलांनी सजवलेल्या रथावर स्वयंभू पांडुरंग विराजमान होण्यापूर्वी विधीवत महापूजा करण्यात आली. डॉ.अमित हिवराळे व डॉ.मृणालिनी हिवराळे या दाम्पत्याने स्वयंभू पांडुरंगाची व रथाची महापूजा केली. यावेळी आमदार शिरीष चौधरी यांचीही उपस्थिती होती. त्यानंतर स्वयंभू पांडुरंगाच्या मूर्तीला रथावर विराजमान करण्यात आले व पांडुरंगाचा जयघोष करीत रथोत्सवाला सुरुवात झाली. यावेळी परिसरातील भजनी मंडळ, इस्कॉन भजनी मंडळ आदी सहभागी झाले होते. विधीवत पूजेचे पौरोहित्य दिनेश जोशी महाराज व त्यांच्या सहकार्‍यांनी केले.
शहरातील सुभाष चौकात रथावर विराजमान असलेल्या साक्षात स्वयंभू पांडुरंगाच्या स्वागतासाठी महाकाय रांगोळी काढण्यात आली. त्यासाठी जवळपास शंभर ते सव्वाशे किलो रांगोळीचा वापर करण्यात आला. कला शिक्षक राजू साळी व त्यांचे सहकारी तसेच विकी जयस्वाल यांनी त्यासाठी परिश्रम घेतले. सायंकाळी महाआरती करण्यात आली तसेच रथोत्सवाच्या मार्गावर गोपाळ तेली यांनी भाविकांना बुंदीचा प्रसाद वाटप केला.
रथोत्सव मिरवणूक शहरातील रथगल्ली, लक्कड पेठ, सुभाष चौक, खुशालभाऊ रोड ब्राह्मण गल्ली, मार्गाने जात ही मिरवणूक पुन्हा रथ गल्ली येथे येऊन पार पडली. यावेळी मंदिराचे प्रमुख पुंडलिक महाराज, प्रवीण महाराज, मिथीलेश महाराज, तंत्र व वैद्यक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद महाजन, दिगंबर महाराज पंढरपूर मठाचे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे, माजी नगराध्यक्ष निलेश राणे, किरण चौधरी, नगरसेवक केतन किरंगे, राकेश जैन, सिद्धेश्वर वाघुळदे, डॉ.श्रीकांत कुलकर्णी यांचीही उपस्थिती होती. सहा.निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सय्यद , विनोद गाभणे व त्यांच्या सहकार्‍यांनी चोख बंदोबस्त ठेवला. रथगल्ली मित्रमंडळाने रथोत्सव यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.