यावल – शहरातील भुसावळ रस्त्यावर असलेल्या एका बियर शॉपीवर बुधवारी सायंकाळी बिअर घेण्यासाठी चौघे आल्यानंतर त्यांनी दिलेली पाचशे रुपयांची नोट बनावट असल्याचा संशय दुकानदाराला आल्यानंतर त्याने तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर एक जण निसटण्यात यशस्वी झाला तर तिघांना मात्र शिताफीने पकडण्यात यश आले. संशयीतांकडून 97 हजारांचा बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. एक पसार संशयित मध्यप्रदेशचा असून त्याच्या शोधार्थ पथक रवाना करण्यात आले आहे.
शहरात भुसावळ रस्त्यावरील शेतकी संघाच्या व्यापारी संकुलात असलेल्या एका बियर शॉपीत बियर घेण्यासाठी श्रावण गंभीर महाजन (रेंभोठा, ता.रावेर), राजेंद्र मुरलीधर पाटील (अयोध्या नगर, जळगाव), निलेश सुरेश पाटील (डोणगाव, ता.धरणगाव) व मध्य प्रदेशातील एक अन्य असे चौघे आले. चौघांनी बियर घेतल्यानंतर 500 रुपयांची नोट दिली. दरम्यान ती नोट नकली असल्याचे व्यावसायीकाच्या निदर्शनास आले. त्याने तातडीने पोलिसांना याबाबत माहिती दिली.
घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, सहायक फौजदार असलम खान, हवालदार अर्षद गवळी, न्याजोद्यीन तडवी, सांगळे असे पोलिसांचे पथक दाखल झाले. त्यांना पाहून त्या चौघांपैकी दोघांनी तेथून पळ काढला तर इतर दोघांना व्यावसायीकाने पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले तर पसार होण्याच्या बेतात असलेल्या तिसर्याला देखील पोलिसांनी पकडले. या तिघांकडून 97 हजार रुपये दराच्या 194 बनावट 500 च्या नोटा जप्त करण्यात आल्या.
याप्रकरणी यावल पोलिसात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या सर्व नकली नोटा भारतीय स्टेट बँकेच्या, यावल शाखेच्या व्यवस्थापकांकडे सोपवण्यात आल्या. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे करीत आहे. दरम्यान, निवडणुकीच्या धामधूमीत चलनात आलेल्या बनावट नोटांमुळे व्यापार्यांसह नागरिक मात्र आता चांगलेच धास्तावले आहेत.



