जळगाव – राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार नवनियुक्त शिक्षकांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करणे अपेक्षित आहे. त्यानुसार शिक्षक होण्यासाठी आवश्यक सेवापूर्व प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर शाळेत रूजू झाल्यावर नवनियुक्त शिक्षक उत्साहवर्धक व आनंददायी असतात. अशा नवनियुक्त शिक्षकांनी नवीन कार्यक्षेत्राच्या संस्कृतीशी जुळवून घेऊन विद्यार्थ्यांचे हित जोपासण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहावे व यात सातत्यपूर्णता ठेवावी, असे आवाहन जळगाव जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था तथा डायटचे प्राचार्य डॉ. अनिल झोपे यांनी केले.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यातर्फे जळगाव जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून जळगाव येथील अध्यापिका विद्यालयात आयोजित प्रशिक्षण वर्गाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. चंद्रकांत साळुंखे, वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. प्रतिभा भावसार मॅडम, अध्यापिका विद्यालयाच्या प्राचार्या डॉ. लीना महाजन, सुलभक डॉ. जगदीश पाटील, प्रा. जागृती भोळे, प्रा. माधुरी येवले, प्रा. यामिनी भोळे, प्रा. पूनम चौधरी, विशाखा जोशी, प्रा. चेतन लोहार, प्रा. दीपक पिंगळे, उमेश बाविस्कर आदी सुलभक उपस्थित होते. डायट प्राचार्य डॉ. अनिल झोपे म्हणाले की, प्रशिक्षणामुळे नवनियुक्त शिक्षकांचा आत्मविश्वास वृद्धिंगत होईल. सेवाप्रवेशोत्तर प्रशिक्षण झाल्याने विद्यार्थी संपादणूक पातळी देखील उंचावण्यास मदत होईल, प्रास्ताविक व सूत्रसंचालन बालभारतीच्या मराठी भाषा अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. जगदीश पाटील यांनी केले. हे प्रशिक्षण वर्ग दि. 4 ते 11 नोव्हेंबर दरम्यान चालणार आहे. जळगाव जिल्ह्यात जळगाव, चाळीसगाव, मुक्ताईनगर, सावदा व जामनेर अशा पाच ठिकाणी प्रशिक्षण वर्गास सुरूवात झाली. जळगाव जिल्ह्यातील प्राथमिक विभागात नव्यानेच रूजू झालेल्या सुमारे 559 शिक्षकांसाठी सदरचे प्रशिक्षण घेण्यात येत आहे.
चौकट –
शिक्षकांची गुणवत्ता व प्रेरणा अपेक्षित निकषापर्यंत पोहोचण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांचे भवितव्य सुनिश्चित करण्यासाठी शिक्षकांना प्रेरित करणे व सक्षम करणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांना प्रशासकीय बाबी, अध्ययन-अध्यापन प्रक्रियेशी निगडित बाबी, मूल्यमापनाची अद्ययावत तंत्रे, विविध योजना, सेवाशर्ती व नियमावली, कायदे, विविध समित्या, व्यावसायिक मानके, सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासाच्या संधी यांची माहिती असणे गरजेचे आहे. यादृष्टीने नवनियुक्त शिक्षकांसाठी प्रभावी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.
- डॉ. चंद्रकांत साळुंखे,
जिल्हा समन्वयक, नवनियुक्त शिक्षकांचे प्रशिक्षण


