कौटुंबिक वाद विकोपाला जाऊन पती-पत्नीची आत्महत्या ; रावेर तालुक्यातील विवरे येथील घटना,


रावेर :- किरकोळ कारणावरून वाद विकोपाला जाऊन पती-पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज रविवारी दि. ३ नोव्हेंबर रोजी दुपारी तालुक्यातील विवरे खुर्द येथे घडली आहे.

ऐन सणाच्या दिवशी भाऊबीजला ही दुदैवी घटना घडल्याने निंभोरा पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे. सदर वाद हा पतीच्या दारू पिण्यावरून झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. त्यामुळे गावात दारूबंदी करा अशी कळकळीची आग्रही मागणी पोलिसांकडे ग्रामस्थांनी केली आहे.

पती अनिल देविदास हरणकर (वय ४०) तर पत्नी शितल अनिल हरणकर (वय ३५) असे आत्महत्या केलेल्यांची नावे आहे. विवरे खुर्द ता. रावेर येथिल कुंभार वाडा येथे एक मुलगी व दोन मुले यांच्यासह राहत होते. विटभट्यावर काम करुन उदानिर्वाह करून आपले कुटुंब चालवत होते. आज रविवारी दि. ३ रोजी घरगुती कारणावरून दोघांमध्ये वाद झाले. वाद विकोपाला गेल्यानंतर दोघांनी राहत्या घरी लांब रुमालच्या सहायाने गळफास घेतला. ही घटना त्यांचा लहान मुलगा पाणी पिण्यासाठी वरच्या रूम मध्ये गेला असतांना समजली. यावेळी आजू-बाजूचे ग्रामस्थांनी दोघांना रावेर ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

यावेळी लहानग्या मुलांनी मन हेलावणारा आक्रोश केला. विवरे खुर्द गावात प्रत्येक भागात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री होते. यामुळे गरीब कुटुंबातील मुल व्यसनाधीन होत आहे.गावात दारूबंदी करून आमच्या मुलांना व्यसना पासुन वाचवा, अशी आर्त हाक ग्रामस्थांनी पोलिस प्रशासनाकडे केली आहे. दरम्यान, आत्महत्येच्या घटनेप्रकरणी निंभोरा पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे.