संत गाडगे महाराज नगरपालिका रुग्णालय येथे रुग्णांच्या जिवाचे हाल ; कोरोना काळापेक्षा सुद्धा दुय्यम वागणूक – केदार सानप यांचा आरोप :

भुसावळ – येथील संत गाडगे महाराज नगरपालिका रुग्णालय येथे रुग्णांना कोरोना काळापेक्षा सुद्धा दुय्यम दर्जाची वागणूक दिली जात असून रुग्णाचे तपासणी करीता सुमारे तीन ते चार फूट लांब उभे ठेवून परस्पर रोगनिदान करून औषधोपचार केला जात असल्याच्या तक्रारी गेल्या अनेक दिवसांपासून सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांना लोकांनी दिल्या होत्या . सद्य परिस्थिती बद्दल शहानिशा करण्याकरिता स्वतः केदारनाथ सानप हे स्वतः रूग्ण बनून दि. 23 ऑक्टोबर रोजी नगरपालिका रूग्णालयात गेले होते. व लोकांनी केलेल्या तक्रारी सत्य असल्याचे त्यांचे निदर्शनास आले सानप यांनी या घटनेची संबंधितांनी त्वरित दखल घ्यावी अशी मागणी केली असून याप्रकरणी मुख्याधिकारी व जिल्हाधिकारी यांना तक्रार करणार असल्याची माहिती दिली आहे .

सानप यांनी रितसर केसपेपर काढून तब्बेत खराब असल्याचे सांगत संबंधित डॉ.उज्ज्वला भंगाळे यांच्याकडे गेले असता रूग्णांच्या आलेल्या तक्रारीनुसार खरोखरच त्या ठिकाणी डॉक्टरांच्या टेबलापासून जवळपास तीन ते चार फुट अंतरावर दोरी बांधण्यात आली होती. या दोरी पलिकडूनच त्या रूग्णांची तपासणी करित होत्या. तशीच तपासणी केदारनाथ सानप यांची देखील केली व केवळ त्यांनी सांगितल्या नुसार त्यांना हात न लावता अथवा कोणत्याही प्रकारे न तपासता औषधी लिहून दिली. यावेळी श्री.सानप यांनी डॉक्टरांना या दोरीबाबत विचारले असता येथे वेगवगळ्या आजाराचे पेशंट येतात. यात टीबीसारख्या रोगाचेही पेशंट असतात याबाबत तुम्ही बाबुजीशी बोला अथवा मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ.किर्ती फलटणकर यांच्याशी बोला असे सांगितले.

मात्र यावेळी डॉ कीर्ती फलटनकर उपस्थित नसल्याने सानप बाबुजींशी बोलले असता त्यांनी ताबडतोब दोरी काढण्याचे आदेश कर्मचार्‍यांना. सानप यांच्या समोर दिले. मात्र यापुढे असा कुठलाही प्रकार पुन्हा होवू नये अथवा रूग्णांच्या जीवाशी डॉक्टरांनी खेळू नये, याकरिता याबाबत मुख्याधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी सांगितले.