भुसावळातील डॉ बाबासाहेब आंबेडकर व्यापारी संकुलाचा लिलाव वादाच्या भोवऱ्यात ; ‘कम्प्लिशन’ नसल्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

भुसावळ – भुसावळ शहरातील सर्वे नंबर 161 मधील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व्यापारी संकुलातील गाळ्यांचा ई- लिलाव करणार असल्याची जाहिरात दि-01/10/ 2024 रोजी मुख्याधिकाऱ्यांच्या नावाने स्थानिक वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेली होती. मात्र सदरील व्यापारी संकुलाचा बांधकाम पूर्णत्वाचा दाखला ( complition certificate) नसून सदरील e-लिलाव प्रक्रिया ही बेकायदेशीर असल्याने सदरील ई-लिलाव प्रक्रियेला स्थगिती देण्यात यावी, अशा आशयाची लेखी तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे केलेली आहे.

तसेच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सदरील ई-लिलाव प्रक्रियेला स्थगिती देणार असल्याचे आश्वासन दिल्याचे केदारनाथ सानप यांनी सांगितलेले आहे.

दरम्यान, भुसावळ नगर परिषदेच्या व्यापारी संकुलाच्या ई-लिलाव प्रक्रिया संदर्भातील या कायदेशीर गोंधळामुळे जिल्हाधिकारी ,जळगाव यांनी संबंधित व्यापारी संकुलाच्या ई-लिलाव प्रक्रियेला स्थगिती देण्याचे आदेश काढल्यास भुसावळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. कारण वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या जाहिरातींवर झालेला खर्च हा मुख्याधिकारी यांच्याकडून वसुल केला जाऊ शकतो ? अशी शक्यता निर्माण झालेली आहे. गेल्या आठवड्यात नव्यानेच रुजू झालेल्या मुख्याधिकारी यांना नगर परिषदेच्या नगररचना आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित व्यापारी संकुलाच्या ई-लिलाव निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याआधी कायदेशीर प्रक्रियेची सविस्तर माहिती मुख्याधिकारी यांना न दिल्यामुळेच हा गोंधळ झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. त्यामुळे आता जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडून येणाऱ्या स्थगिती आदेशाकडे भुसावळतील व्यापारी वर्गासह नागरिकांच्या नजरा लागून आहेत

भुसावळ शहरातील भुसावळ शहर मुनिसिपल शॉपकीपर्स असोसिएशनने दि-05/10/2024 दै. दिव्य मराठी मध्ये या ई-लिलाव प्रक्रियेसंदर्भात हित/अहित जाहिरात दिलेली होती. याची व्यापाऱ्यांमध्ये चर्चा झाल्यानंतर दिनांक-07/10/2024 रोजी या जाहिरातीला भुसावळ नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी जाहीर नोटीसद्वारे वृत्तपत्रांमध्ये जाहिरात प्रसिद्ध करून संबंधित व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना दिनांक-08/10/2024 रोजी मुख्याधिकारी यांच्या दालनात येऊन लेखी खुलासा करण्यास सांगितले होते. मात्र याबाबतची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे नगर परिषदेच्या व्यापारी संकुलाच्या ई-लिलाव प्रक्रियेदरम्यान झालेल्या भोंगळ कारभाराची भुसावळ शहरात एकच चर्चा सुरू झालेली आहे.