यावल : यावल तालुक्यातील साकळी या गावातील 42 वर्षीय इसम हा गुरूवारी कटुर्ले तोडण्यासाठी शेतात गेला असता घरी परतलाच नाही. दुसर्या दिवशी त्याच्या लहान भावाने त्याचा शोध घेतला असता तो शेतात मृतावस्थेत आढळून आला. कुठल्यातरी वन्यजीवने चावा घेतल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सखाराम दयाराम भील (42) असे मयताचे नाव आहे.
सखाराम हा गुरुवारी आपल्या घरून शेतात आपण कटुर्ले तोडण्यासाठी जात असल्याचे सांगून निघाला होता. तो घरी परत न आल्याने शुक्रवारी त्याचा भाऊ विनोद भीलने त्याचा शोध घेतला असता सखाराम भील हा साकळी शिवारातील सूर्यभान जंजाळे यांच्या शेतात मृतावस्थेत आढळला. तातडीने त्याला तेथून यावल ग्रामीण रुग्णालयात आणले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ.तुषार सोनवणे यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. कुठल्यातरी वन्यजीवने चावा घेतल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात विनोद भिल यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अर्जुन सोनवणे करीत आहे.



