यावल : यावल तालुक्यातील निंबादेवी धरण येथे मित्रांसह पर्यटनासाठी व पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाय घसरून तो खड्ड्यात पडल्याने पाण्यात बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज रक्षाबंधनाच्या दिवशी सोमवार दि. १९ ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली आहे. घटना प्रकरणी यावल पोलीस स्टेशनला नोंद करण्याचे काम सुरू होते.

वेदांत सुवर्णसिंग पाटील (वय २०, रा. निमगाव ता. यावल) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो निमगाव येथे आई-वडील, बहिण यांच्यासह राहत होता. वडील शेती काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करतात.
दरम्यान, सोमवारी दि. १९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधननिमित्त सुट्टी असल्यामुळे निमगावातील काही तरुणांसोबत वेदांत पाटील हा निंबादेवी धरण येथे पोहोचण्यासाठी गेला होता. त्या ठिकाणी अचानक त्याचा पाय घसरून तो पाण्यातला खड्ड्यात पडल्याने बुडायला लागला.
दरम्यान, त्याच्या मित्रांनी आरडाओरडा केली. त्यावेळी आजूबाजूच्या ग्रामस्थांनी धाव घेत पाण्यात उडी घेऊन तरुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला त्याला पाण्याबाहेर काढल्यावर सुद्धा या वेळेला काही तरुणांनी त्याला सीपीआर देऊन जीव वाचवण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर त्याला किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथून पुढील उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल तायडे यांनी तपासून त्यास मृत घोषित केले.
दरम्यान, यावेळी वेदांत पाटीलच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. डोळ्यांसमोर मित्र बुडाल्याने मित्रांना शोक अनावर झाला होता. यावल पोलीस यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तर रात्री उशिरापर्यंत पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते.
एकुलता एक मुलगा व बहिणीच्या पाठीवरील एकुलताएक भाऊ ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी मृत्युमुखी पडल्याने पाटील कुटुंबीयांना धक्का बसला आहे. निमगाव गावामध्ये शोककळा पसरली आहे.


