अमळनेर,

घर नावावर करण्यासाठी नकार देत असल्याने वृद्धाच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याच्या प्रयत्न अमळनेर येथील बाहेरपूरा महोल्ला या ठिकाणी दिनांक 12 रोजी करण्यात आला. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात ९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ख्वाजा हसन अब्दुल गणी (72, रा. बाहेरपूरा महोल्ला, अमळनेर) हे परिवारासह राहतात. सोमवारी (दि.12) रोजी सकाळी १० वाजता ते घरी असतांना गुलाम अब्दुल रहेमान तेली यांनी त्यांच्या आठ साथीदारांसह (रा. गांधीनगर, अमळनेर) घरासमोर येऊन शिवीगाळ करत राहते घर नावावर करून देण्यास बळजबरी केली. मात्र ख्वाजा हसन अब्दुल गणी यांनी राहते घर अब्दुल तेली यांच्या नावावर करून देण्यास नकार दिला.
दरम्यान नकार देताच गुलाम अब्दुल रहेमान तेली, रफिक अब्दुल रहेमान तेली, रहिम रमजान तेली, कांती रमजान तेली, जिशान कमाल तेली, असीम कमाल तेली, बाबु रमजान तेली, सादीक बाबु तेली, आसीफ बाबु तेली (सर्व रा. गांधी नगर, अमळनेर) यांनी 72 वर्षीय वृध्द ख्वाता गणी यांना मारहाण करून अंगावर पेट्रोल टाकून दिले. त्यानंतर आग लावून पेटवून जाळण्याचा प्रयत्न केला असता ते थोडक्यात बचावले आहे.
याप्रकरणी ख्वाजा हसन अब्दुल गणी यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार मंगळवारी (दि. 13) रोजी दुपारी १२ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अक्षदा इंगळे या करीत आहेत.


