ऑगस्टच्या १९ तारखेपर्यंत राज्यात कडक ऊन : तर २० तारखेपासून पुन्हा बिघडणार वातावरण : बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा होणार


मुंबई,

राज्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. कडक उन्हाची सुरुवात झाली असून जेष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी मोठी अपडेट दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ ऑगस्ट पासून ते १९ ऑगस्ट पर्यंत राज्यात कडक सूर्यदर्शन होणार आहे. १९ ऑगस्टपर्यंत राज्यातील बहुतांशी भागांमध्ये सूर्यदर्शनाची शक्यता आहे. मात्र असे असले तरी राज्यातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांमध्ये १७ तारखेपर्यंत पावसाची शक्यता आहे.

तसेच धुळे, नंदुरबार, जळगाव, अमरावती, अकोला, बुलढाणा, परतवाडा, अकोट, अचलपूर, वर्धा, नागपूर या भागांमध्ये देखील १७ तारखेपर्यंत पावसाच्या सरी बरसत राहणार आहेत. १९ ऑगस्ट नंतर मात्र हवामानात मोठा बदल होणार आहे. पंजाबरावांच्या मते २० ऑगस्ट ते २ सप्टेंबर दरम्यान बंगालच्या खाडीत दोन लो प्रेशर तयार होणार आहेत.

या बंगालच्या खाडीत तयार होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात आणि कर्नाटकात मुसळधार पावसाची शक्यता आहे. २० ऑगस्ट पासून ते दोन सप्टेंबर पर्यंत महाराष्ट्रात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता पंजाबरावांनी वर्तवली आहे. यामुळे १९ ऑगस्टपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांनी शेतीची कामे उरकून घ्यावीत असे आवाहन पंजाबरावांनी केले आहे.