भुसावळ – भुसावळ शहरातील श्री.र.न.मेहता हिंदी प्राथमिक विद्यामंदिरात ‘हर घर तिरंगा’ अभियान अंतर्गत तिरंगा रॅली, तिरंगा मॅरेथॉन, तिरंगा देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम, तिरंगा प्रतिज्ञा, तिरंगा सेल्फीज या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. स्वातंत्र्याचा उत्सव हर घर तिरंगा म्हणजेच घरोघरी तिरंगा या अभियानाच्या माध्यमातून साजरा करण्यात येत आहे.
मी आपला तिरंगा ध्वज फडकवेल व स्वातंत्र्य सैनिक व वीर हुतात्मे यांच्या भावनेचा सन्मान करेल आणि भारताच्या विकास आणि प्रगतीसाठी स्वतःला समर्पित करेन, अशी तिरंगा प्रतिज्ञा विद्यार्थ्यांनी घेतली. देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम या अंतर्गत विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत गायन, नृत्य, वेशभूषा, एकांकिका, नाटीका सादर केल्या. विद्यालयात तिरंगा रॅली तसेच तिरंगा सायकल रॅली काढण्यात आली. प्रसंगी विविध देशभक्तीपर तसेच सामाजिक शैक्षणिक महती सांगणार्या घोषणा देण्यात आल्या व तिरंगा मॅरेथॉन विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आली. प्रधानाध्यापिका रीता शर्मा यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.



