पाचोरा –
जन्मदात्या बापानेच मुलाच्या डोक्यात शेतीच्या लोखंडी अवजाराने वार करत गंभीर जखमी केल्याची घटना तालुक्यातील विष्णुनगर येथे घडली आहे. जखमी मुलावर जळगांव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असुन जखमी मुलाच्या बापा विरुध्द पाचोरा पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील विष्णुनगर (गाळण) येथे अजमल यमजी चव्हाण हे मुंबई पोलीस दलातील सेवानिवृत्त कर्मचारी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहेत. १३ मार्च रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास अजमल चव्हाण यांचे त्यांची पत्नी गंगाबाई चव्हाण यांचेशी किरकोळ कारणावरून वाद झाले. रागाच्या भरात अजमल चव्हाण यांनी शेतीच्या कामासाठी वापरण्यात येणारे वखरणीचे पास हातात घेऊन पत्नी गंगाबाई चव्हाण यांना मारण्यासाठी घेतले असता गंगुबाई चव्हाण ह्या घाबरून दुसऱ्या खोलीत पळाल्या. त्या खोलीत कन्हैया अजमल चव्हाण (वय – २५) हा त्यांचा मुलगा झोपलेला होता. अजमल चव्हाण हे पत्नी व कन्हैया यांना उद्देशून तुम्ही माझ्या जिवावर मातले आहे. असे म्हणत हातातील वखरणीचे पास थेट झोपलेल्या कन्हैया याचे डोक्यात मारले. क्षणार्धात कन्हैया हा रक्ताच्या थारोळ्यात गंभीर जखमी झाला. सदरचा प्रकार गंगुबाई यांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केली असता शेजारील ग्रामस्थांनी कन्हैया यास रुग्णालयात दाखल केले असता प्रकृती गंभीर असल्याने कन्हैया यास जळगांव येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असुन त्याचेवर उपचार सुरू आहेत. गंगुबाई चव्हाण यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अजमल यमजी चव्हाण यांचे विरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला असुन या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक योगेश गणगे हे करीत आहे.



