स्नुषा रक्षा खडसेंना राष्ट्रवादीकडून तिकीटाची ऑफर मात्र त्या म्हणाल्या भाजपातच राहणार : आमदार खडसेंची स्पष्टोक्ती

जळगाव : ज्यावेळी माझ्या अडचणी वाढवण्यात आल्या खरं त्यावेळी भाजपात गेलो असतो तर कुणीही काही म्हटले नसते, अनेक प्रकारे माझा छळ करण्यात आला हे सर्वांना ठावूक आहे त्यामुळे आता भाजपात जाण्याचे कुठलेही प्रयोजन नाही, अशी स्पष्टोक्ती राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी जळगावात माध्यमांना दिली. राज्यात सर्वात चर्चेत असलेल्या रावेर लोकसभेच्या जागेवर राष्ट्रवादीने उमेदवारीचा दावा केला आहे शिवाय रक्षा खडसे यांनादेखील आपण उमेदवारीबाबत विचारणा केली मात्र त्यांनी स्पष्टपणे अखेरपर्यंत भाजपामध्ये राहणार असल्याचे स्पष्ट केल्याने त्या राष्ट्रवादीच्या उमेदवार नाहीत, असेदेखील नाथाभाऊंनी जळगावात स्पष्ट करीत अनेक चर्चांना पूर्णविराम दिला.
भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांवर मौन सोडताना आमदार खडसे म्हणाले की, मला जायचं असेल तर यांच्या (मंत्री गिरीश महाजन) यांच्या परवानगीची गरज नाही. मी लपून-छपून जाणार नाही. मात्र जेव्हाही जाईल त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कळवेल. भाजपमध्ये जाण्याचं कुठलंही मेजर कारण नाही आणि माझी इच्छाही नाही. मात्र केव्हाही जाईल त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कळवेल. शरद पवार यांच्या संमतीने जाईल. मी लपून-छपून जाणार नाही. ज्यावेळी जाईन तेव्हा उघडपणे जाईन. पण शरद पवार यांच्या सल्ल्याने जाईन असं खडसे म्हणाले. मी 40-42 वर्ष भाजपमध्ये होतो. त्यामुळे यांच्यापेक्षा (मंत्री गिरीश महाजन) वरिष्ठांशी माझे चांगले संबंध आहेत आणि आजही आहेत. पक्षाच्या तत्त्वाशी मतभेद असू शकतात मात्र व्यक्ती म्हणून मी काही कोणाशी मारामार्‍या केलेल्या नाहीत, असं एकनाथ खडसे म्हणाले.
रक्षा खडसे यांनी मला कधी भाजपमध्ये यावं असं सांगितलं नाही. मला भाजपमध्ये यावं, असं आवाहन करावं एवढी मोठी रक्षाताई अजून झालेली नाही. माझे सरळ नड्डाजी यांच्याशी संबंध आहेत. हे मी कधी लपवून ठेवलेलं नाही. शरद पवार यांनासुद्धा ते माहित आहे. शरद पवार यांनी मला सहा वर्षांसाठी आमदारकी अशा काळात मिळवून दिली आहे त्यावेळी मी अंधारात होतो. मी आजपर्यंत शरद पवारांच्या सल्ल्याशिवाय कुठलीही गोष्ट केलेली नाही. आता तरी सध्या माझ्या डोक्यात असा कुठलाही विषय नाही, असं एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलं.
रावेरची जागा ही शरदचंद्र पवार गटाला सोडण्यात आली असल्याचे महाविकास आघाडीकडून सांगण्यात आले मात्र अद्याप अधिकृत घोषणा झाली नसली तरी रावेर लोकसभा पूर्ण ताकदनिशी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट लढवणार आहे. इच्छुक उमेदवारांची यादी वरिष्ठ पातळीवर पोहोचलेली आहे. चार ते पाच उमेदवार इच्छुक आहेत. मी स्वत:ही रावेरमधून एक दावेदार असून अंतिम निर्णय पक्ष घेईल, असे आमदार खडसे म्हणाले.