भुसावळ : रेल्वे प्रशिक्षण संस्थेत (झेडआरटीआय) लावलेल्या भाडे तत्वावरील वाहनाच्या लॉग बुकवर जुन्या तारखेत स्वाक्षरी करण्यासाठी तडजोडीअंती नऊ हजारांची स्वीकारताना झेडटीआरआयच्या प्राचार्यासह कार्यालय अधीक्षकाला पुणे सीबीआयने बुधवार, 6 मार्च रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास अटक केली होती. अटकेनंतर संशयित 48 तास सीबीआय कोठडीत राहिल्याने त्यांचे रेल्वे प्रशासनातर्फे निलंबन करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. कार्यालय अधीक्षक (टेंडर)योगेश देशमुख व प्राचार्य सुरेश चंद्र जैन अशी निलंबित संशयितांची नावे आहेत.
भुसावळातील एका तक्रारदार तरुणाने रेल्वे प्रशिक्षण संस्थेत भाडे तत्वावर वाहने लावली आहेत. मार्च एण्ड पूर्वी लावलेल्या वाहनांचे बिल काढण्यासाठी प्राचार्यांनी दहा हजारांची लाच मागितली मात्र नऊ हजारावर तडजोड करण्यात आली. तक्रारदाराला लाच द्यावयाची नसल्याने त्यांनी पुणे सीबीआयकडे तक्रार नोंदवल्यानंतर सापळा रचण्यात आला. बुधवार, 6 मार्च रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास तक्रारदाराकडून योगेश देशमुख याने लाच रक्कम स्वीकारली व प्राचार्यांना लाच रक्कम देण्यासाठी तो दालनात शिरताच दबा धरून बसलेल्या सीबीआय पथकाने दोघांना अटक केली. दरम्यान, सुरूवातीला न्यायालयाने संशयितांना दोन दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आल्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली व सोमवारी त्यांना जामीन मंजूर करण्यात आला.
लाच प्रकरणी कोठडीत असलेले लाचखोर रेल्वे प्रशिक्षण संस्थेतील कार्यालय अधीक्षक (टेंडर)योगेश देशमुख व प्राचार्य सुरेश चंद्र जैन यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केल्यानंतर सोमवारी तो मंजूर करण्यात आला. 20 हजारांचा जात मुचलका व 20 हजारांचा पर्सनल बॉण्डवर दोघा संशयितांना जामीन मंजूर करण्यात आला तर प्रत्येक सोमवारी सीबीआय कार्यालयात सकाळी 10 ते 11 या वेळेत हजेरी लावण्याचे निर्देश देण्यात आले. संशयितातर्फे अॅड.शर्मा, अॅड.केतन ढाके यांनी काम पाहिले.
लाच प्रकरणी झेडआरटीआयचे प्राचार्य सुरेश चंद्र जैन व कार्यालय अधीक्षक योगेश देशमुख यांचे वरीष्ठ स्तरावरून निलंबन करण्यात आल्याची माहिती रेल्वेच्या अधिकृत सूत्रांनी दिली.



