भुसावळकरांना दिलासा : शहरात 31 रस्त्यांचे सात कोटी 70 लाखांच्या निधीतून होणार काँक्रीटीकरण – संपूर्ण शहर होणार चकाचक :

भुसावळ : सार्वजनिक बांधकाम उत्तर विभागातर्फे वैशिष्टपूर्ण कामांकरीता विशेष अनुदान अंतर्गत भुसावळ नगरपालिकेला 2023-24 मध्ये 31 रस्त्यांच्या काँक्रीटीकरण, पेव्हर ब्लॉक बसविणे या कामांसाठी सता कोटी 70 लाख रुपयांच्या कामांना प्रशासकिय मंजूरी देण्यात आली आहे. आगामी काळात शहरातील प्रमुख 31 रस्ते काँक्रीटीकरण केले जाणार असल्याने ते अनेक वर्ष टिकून राहतील. परिणामी रस्त्याच्या डागडूजीसाठी तसेच डांबरीकरणावर वारंवार होणारा खर्च टाळता येणार आहे. यासोबत या परिसरातील गल्लीबोळांमध्येही काँक्रीटीकरण व पेव्हर ब्लॉक बसविले जाणार आहेत. यामुळे संपूर्ण शहर चकाचक होणार असून रस्त्यांचा प्रश्न कायमस्वरुपी सुटणार असल्याची माहिती आमदार संजय सावकारे यांनी दिली.

पॅचवर्क, मुरुमाचा खर्च टळणार
शहरातील डांबरीकरण झालेल्या रस्त्यावर पाणी साचून खड्डे पडतात. बहूतांश सर्वच प्रमुख रस्त्यांवरुन पाण्याचा निचरा होत नाही. यामुळे रस्ते अल्पावधीत खराब होत असल्याने त्यावर पॅचवर्क, डागडूजी करावी लागते. यापूर्वी डांबरीकरणाच्या रस्त्यांवर लाखोंचा मुरुमही टाकला जात होता. आता डांबरीकरणाऐवजी काँक्रिटीकरणावर भर दिला जात आहे. काँक्रिट रस्ते किमान 15 ते 20 वर्ष टिकणार असल्याने दरवर्षी होणार नाहक खर्च टाळता येईल.

15 प्रभागांमध्ये रस्त्यांची कामे
शहरात पालिकेचे 24 प्रभाग आहेत, यापैकी विशेष रस्ता अनुदानाच्या 7 कोटी 70 लाख रुपयांच्या निधीतून 15 प्रभागांतील 31 कामांचा समावेश करण्यात आला आहे. तर उर्वरित नऊ प्रभागांतील कामे आगामी काळात केली जाणार आहेत. शहरातील सर्व भागांतील प्रमुख मार्ग काँक्रीटीकरण व अंतर्गत गल्लीबोळांमध्ये पेव्हर ब्लॉक बसविण्याचे कामे केली जाणार असल्याचीही माहिती सुत्रांनी दिली.

पावसाळ्यानंतरही होणार कामे
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून होणार्‍या या कामांना आता जिल्हाधिकार्‍यांकडून प्रशासकिय मान्यता मिळाली आहे. आगामी काळात पूढील प्रक्रिया होऊन किमान पावसाळ्यानंतर या कामांना सुरवात होईल, अशी आशा आहे. या दरम्यान लोकसभा निवडणूकीची आदर्श आचारसंहिता लागू होणार आहे. यामुळे कामांना विलंब होण्याचीही शक्यता अधिक आहे.

या रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाला मंजूरी
प्रभाग 19 मधील गंगावाडी, संमती नगर तसेच जूना वांजोळा रोड, वाणी कॉलनी परिसर, प्रभाग 6 मधील अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण प्रभाग 20 मधील हनुमान नगरातील गुरुकृपा टेंट परिसर मोठा हनुमान मंदिर परिसर, प्रभाग 9 मधील पुरुषोत्तम नगर ते चक्रधर नगर तसेच चमेली नगर परिसर, प्रभाग 5 मधील विश्वकर्मा मंदिर ते गणपती मंदिर परिसर, सारंग गॅरेज ते ड. सुहास यांच्या घरापर्यंतचा भाग, प्रभाग 20 मधील श्रीहरी नगर परिसरातील रस्ते.

प्रभाग 22 मधील लक्ष्मीनारायण नगर व मुक्तानंद कॉलनी परिसर तसेच कस्तुरी नगर ते ते तांबट गल्ली, आनंद नगर भाग. प्रभाग 21 मधील आनंद नगर बंब कॉलनी सिंधी कॉलनी रस्ते, तसेच यशोधन पार्क, हूडको कॉलनी गोविंद कॉलनी परिसर. प्रभाग 21 मधील प्रेरणा बिल्डींग, राकेश बेकरी परिसरातील रस्ते, प्रभाग 1 मधील कोटेचा हायस्कूल परिसर, पीपल्स बँक कॉलनी परिसर, प्रभाग 7 मधील सुकदेव पाटील नगर, मोहित कॉलनी भाग.

प्रभाग 8 मधील विद्या कॉलनी ते आराधना चौक, आराधना कॉलनी ते शरिफ तडवी यांच्या घरापर्यंत. प्रभाग 22 मधील भुमिपुत्र चौक ते संजनी पार्क, प्रभाग 1़0 मधील न्यू सतारा गरुड प्लॉट , विठ्ठल मंदिर व राम मंदिर वॉर्ड, प्रभाग 13 मधील गांधी नगर ते गोटू लाहोटी यांच्या घरापर्यंत तसेच सरस्वती नगर परिसर, प्रभाग 18 मधील गंगारा प्लॉट, भवानी पेठ, कोलते गल्ली, प्रभाग 18 मधील शाळा नंबर पाच परिसरातील अंतर्गत रस्ते.