महाशिवरात्री पर्वणी यात्रेसाठी श्री क्षेत्र वालझिरी सजली : वाल्मिकी ऋषींचे जागृत देवस्थान :


आज 8 मार्च 2024 रोजी श्री क्षेत्र वालझिरी येथे महाशिवरात्री उत्सव यात्रेनिमित्ताने भाविकांच्या सोयीसाठी विश्वस्त मंडळाची नियोजनाची बैठक नुकतीच पार पडली या बैठकीत भाविकांची जास्तीत जास्त सोय होण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले. पोलीस प्रशासन महसूल विभाग यांना देखील यात्रेच्या नियोजनासाठी माहिती देण्यात आली त्याचबरोबर आरोग्य विभागाच्या कार्यालयाशी देखील संपर्क साधून त्यांना कार्यक्रमाची तसेच होणाऱ्या भाविकांच्या गर्दीचा अंदाज देण्यात आला.

राज्य परिवहन मंडळाला देखील संस्थेच्या माध्यमातून पत्र देऊन यात्रेसाठी चाळीसगाव पासून जादा बसेस सोडण्याची विनंती करण्यात आली. अग्निशामक विभाग तसेच इतर आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भात देखील नियोजन करून संबंधित विभागांना माहिती विश्वस्त मंडळातर्फे दिली गेली आहे.

एकंदरीत महाशिवरात्री उत्सवाच्या निमित्ताने श्री क्षेत्र वालझिरी विश्वस्त मंडळांनी व्यवस्थित नियोजन करण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्यामध्ये महादेवाची सुंदर आरास हे प्रमुख आकर्षण असणार आहे. सर्व यात्रेनिमित्ताने भेट देणाऱ्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना विश्वस्त मंडळातर्फे विनंती केलेली आहे की भाविकांनी रांगेने व शिस्तीने दर्शन घेतल्यास गर्दी टाळता येईल. संध्याकाळी 7 वाजेनंतर श्री क्षेत्र वालझिरी संस्थेमार्फत ‘शिवसंध्या ‘ हा सुरेल भक्ती गीतांचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. यानिमित्ताने चाळीसगाव शहर तसेच तालुक्यातील सर्व भाविक श्रोत्यांना या कार्यक्रमाचा आनंद घेण्याचे आवाहन संस्थेमार्फत करण्यात आले आहे. सुमारे ते दोन ते अडीच लाख भाविक महाशिवरात्रीच्या पर्वावर दर्शनासाठी येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे .

मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी व पायाभूत सुविधा येत्या वर्षभरात वाढविण्यासाठी ह्या महापर्वावर मोठ्या संख्येने भाविकांनी सहकार्य करण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष व विश्वस्त मंडळाने केले आहे.