भुसावळ – हजारो वर्षांची गौरवशाली परंपरा असलेल्या मराठी भाषेचा उपयोग करून त्यात मोठ्या प्रमाणावर साहित्य निर्मिती करण्याचे काम संतांनी केले आहे. त्यामुळे आधीच सुंदर असलेल्या मराठी भाषेला समृद्ध करून तिचे संवर्धन करण्याचे महत्त्वपूर्ण योगदान संतांनी दिले असल्याचे प्रतिपादन बालभारतीच्या मराठी भाषा अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. जगदीश पाटील यांनी येथे केले.

भुसावळ येथील सार्वजनिक वाचनालयात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर वाचनालयाचे अध्यक्ष हिंमत उर्फ मुन्ना ठाकूर, ग्रंथपाल नितीन तोडकर, म्युनिसिपल हायस्कूलचे मुख्याध्यापक ललितकुमार फिरके, सहाय्यक ग्रंथपाल अवधूत दामोदरे, होनाजी चौधरी उपस्थित होते. प्रारंभी सरस्वती मातेच्या पुतळ्याला डॉ. जगदीश पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर मुख्याध्यापक ललितकुमार फिरके यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. डॉ. जगदीश पाटील यांनी मराठी व शिक्षणशास्त्र विषयात नेट परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल त्यांचा वाचनालयातर्फे अध्यक्ष हिंमत उर्फ मुन्ना ठाकूर यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी डॉ. जगदीश पाटील यांनी स्वलिखित श्री संत एकनाथांच्या अभंगातील भक्ती या ग्रंथासह सुमारे दीड हजार रुपये किमतीची पुस्तके वाचनालयाला सप्रेम भेट दिली. डॉ. जगदीश पाटील यांनी आपल्या मनोगतात मराठी भाषेचे महत्व आणि भाषा संवर्धनात आपली जबाबदारी याबाबत माहिती देऊन मराठी भाषा संवर्धनात संतांनी दिलेले योगदान सांगितले. अध्यक्षीय मनोगत वाचनालयाचे अध्यक्ष हिंमत उर्फ मुन्ना ठाकूर यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन सहाय्यक ग्रंथपाल अवधूत दामोदरे यांनी तर आभार ग्रंथपाल नितीन तोडकर यांनी मानले. यावेळी वाचक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. ग्रंथ प्रदर्शनात सुमारे दोनशेपेक्षा जास्त पुस्तके ठेवण्यात आली होती. त्याचा लाभ वाचकांनी घेतला.
फोटो ओळी – सार्वजनिक वाचनालयाला भेट दिलेली सुमारे दीड हजार रूपयांची पुस्तके डॉ. जगदीश पाटील यांच्याकडून स्वीकारताना वाचनालयाचे अध्यक्ष हिंमत उर्फ मुन्ना ठाकूर सोबत ग्रंथपाल नितीन तोडकर, म्युनिसिपल हायस्कूलचे मुख्याध्यापक ललितकुमार फिरके, अवधूत दामोदरे, होनाजी चौधरी आदी.


