जळगाव : गुन्हेगारांचे दोन गट समोरा -समोर आल्यानंतर शाब्दिक वाद झाला. त्यानंतर एकाने पिस्तुल काढत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हा वाद मिटविण्यासाठी गेलेल्या पोलिस अधिकार्याना धक्काबुक्की करीत धमकावण्यात आले.
शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी संशयित चेतन रमेश सुशिर (19, पिंप्राळा हुडका)े, लखन दिलीप मराठे (30, शिवाजीनगर हुडको), सोनु उर्फ ललित गणेश चौधरी (29, ईश्वर कॉलनी), अतुल क्रिष्णा शिंदे (25, रामेश्वर कॉलनी) यांच्या विरोधात जिल्हापेठ पोलिसात गुरुवारी रात्री गुन्हा दाखल झाला.
गुरुवारी शहरात मोर्चा होता त्यामुळे ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त होता. दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास संशयित चौघे स्वातंत्र्य चौकात समोरासमोर आले. ते झोंबाझोंबी करू लागल्याने सहायक पोलिस निरीक्षक हा वाद मिटविण्यासाठी धावले. यावेळी अंगझडतीत एकाकडे गावठी पिस्तुल मिळून आले. याबाबत विचारपूस केली असता संशयिताने त्यांना धक्काबुक्की करत धमकी दिली. पोलिसांनी संशयिताकडून पिस्तुल, तीन मोबाईल असा 35 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी अधिकार्याच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल झाला. तपास हवालदार वंदना राठोड करत आहेत.



